
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आता एखादा मल्ल राष्ट्रीय शिबिरात किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान डोपिंगमध्ये दोषी सापडला तर खेळाडूबरोबर त्याच्या प्रशिक्षकांवरही कठोर कारवाई करण्याचा निर्णय हिंदुस्थान कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफओए) घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे.
गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानी कुस्तीपटू डोपिंगमध्ये सापडण्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन झाली, त्याचबरोबर हिंदुस्थान कुस्ती महासंघाला मोठा आर्थिक भुर्दंडही बसला. दोन हिंदुस्थानी कुस्तीपटू डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने ‘डब्ल्यूएफओए’ला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) यांच्याकडे तब्बल 32 लाख रुपयांचा दंड भरावा लागला. बऱयाच प्रकरणांत खेळाडू हा डोपिंगबाबत अनभिज्ञ असतो. त्यामुळे तो जर डोपिंगमध्ये दोषी सापडला तर त्यास राष्ट्रीय शिबिरासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षकही तितकेच दोषी आहेत. ट्रेनिंग देण्याबरोबरच या खेळाडूंची दिनचर्या आणि त्यांच्या डाएटबाबतची अंतिम जबाबदारीही प्रशिक्षकांचीच आहे, असे फर्मानच ‘डब्ल्यूएफओए’चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी काढले आहे.
‘डोपिंगमध्ये सापडलेल्या खेळाडूबरोबर त्याच्या प्रशिक्षकावर कारवाई करण्याचा हिंदुस्थान कुस्ती महासंघाने घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे, मात्र हा नियम केवळ राष्ट्रीय शिबिरापुरताच न राहता राज्यस्तरीय शिबिरातही लागू व्हायला हवा म्हणजे खेळाडूला कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच डोपिंगबाबत माहिती मिळेल. नव्या पिढीतील खेळाडूंनी झटपट यश मिळविण्याच्या मागे लागू नये. मेहनत घ्यायला हवी. आपण डोपिंगमध्ये सापडणार नाही यासाठी त्यांनी नेहमीच जागृत राहिले पाहिजे.’ – काका पवार, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू
























































