
अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]
नवोदित लेखिका नेहा खेर… घरात अत्यंत सुखवस्तू समृद्धता असूनही लेखणीच्या माध्यमातून सैनिकांचे कष्ट, त्याग, बलिदान, मांडण्याची कळकळ नेहाशी बोलताना जाणवते….
आम्ही दोघं झुनझुनवालाचे… एकाच वर्गात अकरावीपासून… तेव्हापासूनची आमची ओळख, सहवास…’’ शिल्पा खेर सांगत होत्या त्यांची त्यांच्या यजमानांशी कशी ओळख झाली ते. त्यांच्या ठाण्याच्या घरी मुलाखत घ्यायला गेले तेव्हा दरवाजातच होती पुरुषभर उंचीची समई. मुंबईसारख्या ठिकाणी पाच हजार स्क्वेअर फुटांचं ते घर… छे! घर कसलं, महालच होता तो. गणपतीच्या प्रसन्न मूर्तीच्या साक्षीनं घरातल्या प्रत्येक वस्तूत उमटलेलं होतं सुखवस्तू सौंदर्य. घरातले तीन टेरेस, तिथला झोपाळा, चाफ्यासह अनेक झाडं, अनेक शोभेच्या वस्तू, शाही पनीर, गुलाबजाम, मटकीची उसळ, मठ्ठा, जिलबी, आमटी, पोळी असं परिपूर्ण जेवण… आणि वातानुपूलित स्टडीमधल्या मनसोक्त गप्पा. शिल्पाताईंचे यजमान डॉ. जितेंद्र त्यांच्या हॉटेल आणि बांधकाम व्यवसायातली व्यस्तता बाजूला ठेवून माझ्याशी बोलण्यासाठी खास वेळ काढून थांबले होते.
शिल्पाताई म्हणाल्या, ‘‘मला दहावीला अपेक्षेपेक्षा मार्क थोडे कमी मिळाले होते. रुईयाचा फक्त फॉर्म भरला होता मी. तिथे अॅडमिशन मिळाली नाही म्हणून सरकारतर्फे दिल्या जाणाऱया कॉलेजला, झुनझुनवालाला मी गेले, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये कॉलेज सुरू होऊन महिनाभर उलटून गेला होता. झालेल्या अभ्यासाच्या नोट्स जितेंद्रकडून मला मिळाल्या.’’ जितेंद्र म्हणाले, ‘‘ती आली, तिला पाहिलं आणि मला ती आवडली. दोन दिवसांत तिला नाव विचारलं आणि त्या दिवशी नेमकं तिला गिरगावात आत्याकडे जायचं होतं, पण एकटीनं बस बदलत प्रवास करण्याचं किंवा ट्रेननं प्रवास करण्याचं टेन्शन आलं होतं तिला. मी गिरगावचा हे कळल्यावर तिनं सुटकेचा निःश्वास टाकत सोबत मागितली.’’ आयुष्यभराच्या सोबतीची ती सुरुवात आहे हे त्यावेळी त्या दोघांनाही ठाऊक नव्हतं. डॉ. जितेंद्र यांना डिफेन्समध्ये जायचं होतं. ध्येयाचा पाठलाग करताना त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यात आलेलं तथाकथित अपयशही शिल्पाताईंनी मैत्रीच्या नात्यात अनुभवलं होतं. जीवनसाथी म्हणून एकमेकांना स्वीकारल्यावर शिल्पाताईंकडून सामाजिक स्तरावर जे काही काम झालं, सैनिकांच्या अपंग पुनर्वसन केंद्रांना भेटी देत सैनिकांचं जीवन, त्यांची ध्येयासक्ती यावर जे लिखाण झालं, या सगळ्याचं मूळ डॉ. जितेंद्र यांच्या विचारात, वागण्यात आणि सहवासात आहे हे मला पदोपदी जाणवत होतं.
समाजासाठी काही करायला म्हातारं होण्याची वाट पाहायची गरज नाही हेही आम्ही ठरवलं होतं.’’ ऐन उमेदीत असतानाच समाजाचं ऋण फेडण्याबद्दल दोघांना जाणीव होती. म्हणूनच जितेंद्र सैन्यात जाणार म्हटल्यावर शिल्पाताईंनी, ‘‘मी जवानांच्या मुलांना शिकवीन’’ असं तेव्हाच म्हटलं होतं. म्हणूनच त्यांचे सूर जुळले.
लेखनाची सुरुवात कशी झाली हे सांगताना शिल्पाताई म्हणाल्या, ‘‘मी पाचवीपासूनच कविता करायचे. इकडे तिकडे लिहिलेल्या त्या कवितांची एक वही करायला आधी आजोबांनी आणि नंतर जितेंद्रनं सांगितलं मला. चिकित्सक आणि नंतर होली क्रॉसच्या मराठी माध्यमात शिकले मी. तिथे स्लममधली मुलं होती. माझे आजोबा शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापक. त्यांनी मला शिकवलेलं त्या मुलांना शिकवायचे मी. 10वीला तर एक वर्गच दिला होता मला दोन तास मार्गदर्शन करायला. वात्सल्य आणि प्रेमाचा स्पर्श हरवल्यावर काय वाटतं हे मला माहीत होतं. म्हणूनच नंतर वात्सल्य ट्रस्टमध्ये जायला लागले. अनुभवांची जोड देत लिखाण केलं. ‘सत्यमेव जयते’ या कादंबरीत एका पत्रकार महिलेची अन्यायाविरुद्धची लढाई लिहिली. ‘सोल्जर इन मी’ या पुस्तकातून सैनिकांचा लढवय्येपणा प्रत्येकानं अंगिकारला तर आयुष्यातल्या कुठल्याही संकटांशी सामना करता येतो म्हणून प्रत्येकानं स्वत:तला सैनिक शोधावा हे सांगितलं. ‘ए मेरे वतन के लोगों’ या पुस्तकातली बरीचशी माहिती अपंग कमांडोंच्या अनुभवांवर आधारित आहे. सैनिकांचा त्याग, बलिदान, त्यांचा स्वभाव समजण्यासाठी स्वत:च्या मनाची पातळी उंचावणं आवश्यक आहे. मला एकदा मुलानं म्हटलं की, तू नेहमीच मोठय़ांसाठी लिहितेस. माझ्यासाठी कधी लिहिणार? त्यातूनच ‘जस्ट बिलिव्ह’ लिहून झालं. ते आता इंग्रजीतून येतंय. समर नावाच्या मुलाची अनोखी साहस कथा त्यात आहे. ‘यश म्हणजे काय?’ या पुस्तकात 11 मान्यवरांच्या मुलाखती त्यांच्या यशाचा प्रवास सांगतात. ग्रंथालीनंच ही सारी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. आजोबा, जितेंद्र आणि कृष्ण यांच्यामुळे मी आज जी आहे ती आहे.’’ ‘‘मी लिहीत नाही, कृष्ण माझ्याकडून लिहून घेतो अशी माझी धारणा आहे’’ हे त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांच्या मनात असलेला कृष्ण त्यांना स्फूर्ती देत असतो हे मला जाणवलं. मनाच्या शक्तीला कोणी मनःशक्ती म्हणून स्वीकारतो, तर कोणी सगुण स्वरूपात पाहतो, पण मला वाटतं, सगुण-निर्गुण या वादात न पडता अंत:स्फूर्तीनं हातून घडलेलं काम महत्त्वाचं… जे शिल्पाताईंनी केलं आहे.
शिल्पाताई म्हणाल्या, ‘‘मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की, पैशांपेक्षाही आपलेपणा, प्रेम, संस्कार या गोष्टींचा अभाव मुलांना चांगला माणूस बनण्यापासून रोखतो. मुलांना त्यांची स्वप्नं विचारली तर श्रीमंत व्हायचंय, गाडय़ा घ्यायच्या आहेत असं सांगतात ते, पण मी पराक्रम गाजवीन, देशसेवा करीन असं कोणीच म्हणत नाही. ‘मेरे जजबात से वाकिफ है इस कदर मेरी कलम, मैं इश्क भी लिखना चाहूं, तो इन्कलाब उतर आता है’ म्हणणारा भगतसिंग यांना कळलेलाच नाही. ‘मर्दों के बीच खड़ी वो, मर्द बनी मर्दानी थी’ असं ज्या राणी लक्ष्मीबाईंबद्दल म्हटलं जातं, त्या देशातल्या मुली विनयभंग झाला म्हणून रडत बसतात, सासरचा छळ निमूटपणे सहन करतात, मुलगी झाली तर तिला मारून टाकायला निघतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून त्यादृष्टीनं निरनिराळ्या संस्थांमधून आणि शाळांमधून शिबिरं, संस्कार वर्ग, व्याख्यानं यांच्या माध्यमातून मनामनाशी संवाद साधायला लागले. निसर्गातली प्रत्येक गोष्ट सारखीच महत्त्वाची आहे. त्यामुळे भौतिक गोष्टींच्या प्राप्तीवरून माणसाचं यशापयश तोलता कामा नये हे मनावर ठसविण्याचा प्रयत्न करायला लागले.’’
शिल्पाताईंकडून जेव्हा मी हे ऐकत होते तेव्हा वाटलं, वैचारिक समतोलातून समाजाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष कामातून आणि त्या अनुभवांवर आधारित लिखाणातून करण्याचा प्रयास त्या प्रामाणिकपणे करत आहेत. संस्कारातून विचारांचा जन्म होतो. म्हणूनच डॉ. जितेंद्र यांच्या कल्पनेतून भाग्यश्री फाऊंडेशनची स्थापना केली गेली आहे. कुठलंही सामाजिक काम करताना येणाऱया नकारात्मक प्रतिसादामुळे ‘‘आपल्या कामाची कुणाला किंमतच नाही आणि जर अपेक्षित परिणाम होतच नाही तर माघार घेतलेलीच बरी’’ असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा खूप मोठय़ा आणि प्रचंड संख्यात्मक बदलाची अपेक्षा न ठेवता घडणारा छोटासा बदलही खूप मोठा आहे हे समजण्याची आपली समज आपण प्रगल्भ केली पाहिजे. हा ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याचा मला समजलेला अर्थ, जो शिल्पाताईंच्या भेटीनं अधिकच दृढ झाला.





















































