
दक्षिण हिंदुस्थानातील अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत. तिरुपती मंदिर, सबरीमाला मंदिर, रामेश्वरम मंदिर ही त्यातली काही ठळक उदाहरणं. पण, आता तेलंगणा राज्यात एका भव्य मंदिराची निर्मिती झाली आहे.
या मंदिराचं नाव यदाद्री असं आहे. लक्ष्मी नरसिंहाचं हे मंदिर पुरातन असून त्याचा भव्य पातळीवर जीर्णोद्धार झाला आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल 1100 कोटी इतका खर्च आला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर गेल्या 100 वर्षांत कृष्णशिला (काळा ग्रॅनाईट दगड) वापरून बनवलेलं हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं मंदिर आहे.
या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुरातन वास्तुनिर्मिती शास्त्राला अनुसरूनच याची निर्मिती केली गेली आहे. जेणेकरून हे मंदिर अधिक काळ सुस्थितीत राहू शकेल. हे मंदिर बनवण्यासाठी 140 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्यापैकी 125 किलो सोनं हे गर्भगृहातील घुमट अर्थात विमान गोपुराला वापरं गेलं आहे.
ही आहेत या अद्भुत मंदिराची वैशिष्ट्य-
हे मंदिर 510 फूट उंच यदाद्रीगुट्टा डोंगरावर आहे.
या मंदिरात 1000 वर्षं जुनी भगवान नृसिंहाची स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिरात ज्वाला नृसिंह, गंडभेरुंड नृसिंह, योगानंद नृसिंह अशा नरसिंहाच्या विविध रुपातल्या मूर्ती आहेत.
वैष्णव पंथाचं हे मंदिर संपूर्णतः काळ्या ग्रॅनाईटपासून तयार केलेलं आहे. पुढील अनेक दशकं मंदिर टिकून राहण्यासाठी हा दगड वापरण्यात आला आहे. दगड पारखल्यानंतरच तो मंदिराच्या कामासाठी वापरला गेला आहे.
या मंदिरावरील नक्षीकामासाठी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधून खास पिढीजात कारागिर बोलवण्यात आले. मंदिराच्या दगडांचं जोडकाम करण्यासाठी रेती-सिमेंट न वापरता गूळ, कोरफड, चुना, नारळाचा काथ्या यांपासून तयार केलेलं लाईम मोर्टार वापरण्यात आलं आहे.
गाभाऱ्याच्या सुशोभिकरणासाठी 125 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे.





























































