
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
महाराष्ट्रातील गावागावांत आता यात्रा-जत्रांचे दिवस सुरू होत आहेत… प्रत्येकाची तऱहा वेगळी… वैशिष्टय़ न्यारे…
दिवस सुगीचे सुरू जाहले। ओला चारा
बैल माजले । लेझीम चाले जोरात
ग. ल. ठोकळ यांची ग्रामीण भागातील यात्रा – जत्रा – उत्सवांचे वर्णन करणारी ही कविता ऐकली की एकेकाळी मन हरखून जायचे. हलगी, ढोलकीची जुगलबंदी, संबळाचा ठेका, छेडा, सुरनई, पिपाणीचे आवाज जणू सगळं लोकजीवन घुसळून निघायचे. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी हर्षोल्हासित उन्मनी अवस्था निर्माण व्हायची. सुगीचे दिवस आता संपलेत. महाराष्ट्र कडकडीत दुष्काळाचा सामना करीत आहे तरी नित्याच्या चिंता, विवंचनेला मोकळी वाट करून देत यात्रा-जत्रांचा मोसम सुरू झाला आहे.
`गोडाचा नैवेद्य असतो ती यात्रा. कीर्तन सप्ताह पार पडतात. लळिते, भारूडे काल्याच्या कीर्तनानंतर रंगतात त्या यात्रा आणि क्षेत्रपाल देवतांना दिलेल्या सामिष नैवेद्यासह सुरू असतात त्या जत्रा. शक्ती देवता आणि शिव कुलातील क्षेत्रपाल देवतांचे मंडळीकरण अवघ्या ग्रामीण महाराष्ट्रात आहे. खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा, रवळनाथ, भैरवनाथ, लिंगदेव, कान्होबा या आणि अशा अनेक शिवकुलातील देवता. भवानी, अंबा, रेणुका, सातेरी, भराडी, यमाई, जाखाई या अशा अनेक शक्ती कुलातील देवता. या देवतामंडळाने महाराष्ट्राचे भावगर्भ लोकमानस घडविले आहे ती भावगर्भता व्यक्त होते यात्रा-जत्रांच्या रूपाने. यात्रेप्रमाणेच आता जत्रांचा मोसम सुरू आहे. कोकणात तुळशीच्या लग्नानंतर दशावताराचे खेळ ज्याला ‘दहिकाले’ म्हणतात. कोकणात रात्रभर सुरू होतात. भराडी देवीची यात्रा, रवळनाथाची यात्रा, सातेरी देवीची यात्रा गावोगाव तरंग आणि पालख्यांच्या सोहळ्यासह सुरू असते. कोकणात गोडा नैवेद्य आणि सामिष नैवेद्य असे अजब मिश्रण पाहायला मिळते. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात जत्रांमध्ये तमाशाचे फड रंगतात.
जत्रेत गावाबाहेरच्या मैदानात तमाशाच्या तंबू, राहुटय़ा पडतात. ढोलकी फडाचे तमाशे साधारणतः तीन विभागांमध्ये विभागलेले असतात. पूर्णवेळ तमाशे, हंगामी तंबूचे तमाशे आणि झाडाखालचे तमाशे. तमाशा कलावंतांचं पोट आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि कृषीसंस्कृतीवर निर्भर आहे. दुष्काळाच्या झळा महाराष्ट्रातील शेतकऱयांना विद्यमान स्थितीत बसू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील शेकडो तमाशा कलावंतांची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. उपेक्षा आणि वंचनांच्या राहुटय़ा घेऊन पायात ‘चाळ पोटी भुकेचा काळ। तंबू राहुटीत माय न् बाळ।’ असे तमाशा कलावंतांचे चित्र आज पाहायला मिळते. उघडय़ा आभाळाखालची ही रांगडी गंमत आता अनेक भेडसावणाऱया प्रश्नांनी सुनी सुनी होत चालली आहे.
गण, मुजरा, गौळण, रंगबाजी, फार्सा, वग हा तमाशाचा रूढ अविष्कारक्रम आज जत्रांमध्ये दिसत नाही. मुजरा गौळण झाली की चित्रपटातली गीते आणि त्यावरचा डान्स सुरू होतो. टाळात आणि चाळात मराठी मन सारखंच रमतं. पंढरपूरचा विठोबा हे वारकऱयांचं आराध्यदैवत तर नारायणगावच्या विठाबाई या सर्व रसिकांच्या सम्राज्ञी. जत्रा-यात्रांचा भुलभुलैय्या आजही महाराष्ट्रात कायम आहे.
नारायणगावची मुक्ताईची यात्रा
पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ही तमाशाची पंढरी समजली जाते. चैत्राच्या अखेरीज नारायणगावला मुक्ताईची यात्रा असते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांच्या किमान पन्नास राहुटय़ा नारायणगावला उतरतात. तुकाराम खेडकर, भाऊ बापू नारायणगावकर यांचे पवित्र स्मरण नारायणगावच्या यात्रेत केले जाते. या यात्रेत किमान आठ ते दहा तमाशे मानाचे तमाशे म्हणून सादर होतात.
नांदेड जिह्यातील माळेगावची यात्रा
नांदेड जिह्यातील लोहाजवळ माळेगावचा खंडोबा प्रसिद्ध आहे. माळगावच्या खंडोबाला राज्यभरातील सर्व तमाशे हजेरी लावतात. भटक्या विमुक्त समाजातील सर्व समाजघटकांच्या जात पंचायती तेथे पार पडतात. माकडवाले, अस्वलवाले, उंटवाले, घोडेवाले अशी सर्व मंडळी या यात्रेत उपस्थित असतात. खंडोबाचे हे जागरुक देवस्थान असून डिसेंबरअखेरीस माळेगावची यात्रा असते. समस्त गावकरी खंडोबाची पूजाअर्चना करून यात्रेत रमतात.
मोखाडय़ाचा आदिवासींचा बोहाडा
ठाणे जिह्यातील मोखाडा येथे आदिवासींचा बोहाडा होळीच्या दरम्यान सुरू असतो. वेगवेगळ्या जाती-जमातींच्या घरांमध्ये सोंगांची पिढय़ान्पिढय़ांची परंपरा असते. विशिष्ट जात विशिष्ट सोंगे घेते. बोहाडय़ासमोर खडा तमाशा सादर होतो. रात्रभर सोंगे निघतात. पहाटे शक्तीदेवतेची आरती होते आणि बोहाडा संपतो.
आळंदी-पंढरीच्या यात्रा
कृष्ण, विष्णू, विठ्ठल, राम या देवता ग्रामदेवता झाल्यावर त्यांच्या जन्माचे उत्सव प्रामुख्याने यात्रा म्हणून संबोधल्या जातात ज्यात आळंदी, पंढरी, देहू, पैठणच्या यात्रांचा समावेश होतो. तेथे कीर्तनाचे फड रंगतात. ‘संतभार पंढरीत। कीर्तनाचा गजर होत। तेथे असे देव उभा। जैसी समचरणाची शोभा’ पंढरीला कार्तिकी एकादशीला भक्तजनांची गर्दी लोटते तशीच आळंदीलाही लोटते. काकड आरत्या, कीर्तन सप्ताह, भारूडांचे रंग. या रंगात रंगणारे भाविक गावोगावही कीर्तन सप्ताह आयोजित करतात. त्यात गोदावरी मुंडेचे ‘धरला पंढरीचा चोर’ भजन रंगते तर कुठे चंदाबाई तिवाडींचा बुरगुंडा रंगतो. गोडय़ा नैवेद्याच्या या यात्रा म्हणजे वारकऱयांचे ‘सुखनिधान’. ‘अवघा रंग एकचि झाला’ अशी त्यांची अवस्था. ‘पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी। संतासंगे सर्वकाळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ। प्रेमाचा कल्लोळ आळंदी-पंढरीच्या यात्रेत सुरू असतो. हीच प्रेरणा घेऊन गावचे हरिनाम सप्ताह रंगतात.























































