
सामना प्रतिनिधी। यावल
तालुक्यातील साकळी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत तर्फे घेण्यात आलेल्या ग्रामसभेला गालबोट लागले. ग्रामसभेत ग्रामपंचायत कार्यालयावर उर्दुत नाव टाकावे व महापुरूषाचे फोटो कार्यालयात लावावे. या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. हाणामारीचे रुपांतर दंगलीत झाले. या प्रकरणी ४८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील साकळी गावात शनिवारी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभा घेण्यात आली. ही ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायतीवर उर्दु भाषेत नाव टाकावे आणि महापुरूषांची फोटो ग्रामपंचायतीत लावावे अशी मागणी केल्याने या मागणीस काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला. मागणीस विरोध केल्याचे वाईट वाटून त्यावरून दोन समुदायातील तरुणांमध्ये ग्रामसभेतच वाद झाला व वाद उफाळून त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात काही समाजकंटकांनी थेट ग्रामपंचायतीवर दगडफेक सुरू केली. या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले व जमावाने गावातील रहिवासी यांच्यावर व त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच अक्सा नगरातील गोपाल सुभाष चौधरी यांच्या घरावर दगडफेक करून यांची चार चाकी वाहन इंडिगो गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच ग्रामपंचायतीच्या मागे राहणारे नरेश महाजन, इंदुबाई माळी , योगेश माळी, शांताराम शिंपी यांच्या घरावर सुद्धा दगडफेक केली. यात नरेश महाजन यांच्या घरातील टी.व्ही. फुटून नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यावर पोलीस निरीक्षक डि.के. परदेशी, उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे पथकासह दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची महिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, फैजपुर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग , चोपडा पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या सह मोठा फौजफाटा बंदोबस्ता करीता दाखल झाले. यात यावल, रावेर, सावदा, फैजपूर, निंभोरा, जळगाव , भुसावळ, आडावद ,चोपडा या प्रत्येकी पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि यावल पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी असे सर्व पोलीसाचा फौजफाटा बंदोबस्तासाठी साखळी गावात लावण्यात आलेला होत. तसेच सोबत शीघ्र कृती दल व राज्य राखीव फॉर्स यांची एक – एक तुकडीचा बंदोबस्तासाठी साखळी गावात लावण्यात आलेला होता.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत लोकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने दंगल पसरवणे आदी कलमान्वये 34 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी फिर्यादी वैभव रविंद्र महाजन यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या आई अंजुबाई रविंद्र महाजन यांना रूग्णालयात औषधोपचार करून कुरेशी वाड्यातुन घरी जात असतांना त्यांना पाहून महिला व पुरूषांनी जातीवाचक शिविगाळ केली. शिव्या का देत आहेत अशी विचारणा केली असता दोघांना हॉकीस्टीक व लोखंडी रॉडने मारहाण करीत गंभीर दुखापत केली म्हणून १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोन फिर्यादीवरून एकूण ४८ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी आसिफ खान, कासीम खान, अख्तर शेख, मोमीन तडवी, शेख शोएब, शेख इरफान, शेख अजगर, शाहिद खान, शेख तनवीर, शेख मोहसिन, शेख रफीक, ताहेर खान, शेख अन्सार, शाहबाज खान, शेख रज्जाक, शेख अब्दुल, इम्रान खान या 17 जणांना अटक करण्यात आली आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.पुढील तपास पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी, हवालदार संजय तायडे करीत आहे. गावात तणावाची स्थिती असल्याने यात्रा व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यत इतर संशयित आरोपीचा शोध घेणे सुरू होता.

































































