यवतमाळ : अट्टल दुचाकी चोरटा गजाआड, 23 दुचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व यवतमाळ शहरातून दुचाकी चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही यशस्वी कारवाई यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने केली.

सुभाष गौतम मस्के (वय 50, रा. वायगाव निपाणी, जि. वर्धा), असे अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव आहे. मागील वर्षभरापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या.रुग्णालयात गेलेल्या रुग्णास आणि नातेवाईकास तपासणी करिता वेळ लागतो हे ध्यानात ठेवून हा चोरटा अश्या दुचाकींना लक्ष्य करायचा . दुचाकी चोरीला गेली हे लक्षात येण्या आधीच हा चोरटा रफूचक्कर व्हायचा . जवळपास एक महिन्यापासून डीबी पथकाने शासकीय रुग्णालयात आणि शहरात चोरटा पकडण्यासाठी सापळा रचला. अशातच एक संशयित दुचाकी चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरताना दिसून आला. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबद्दल विचारणा केली असता, त्याने टोलवाटोलवीची उत्तरे दिले. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता वैद्यकीय महाविद्यालयासह शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. वर्धा जिल्ह्यातील निपाणी येथील घरून 11 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या. सुभाष मस्के हा दुचाकी चोरी केल्यावर निपाणी गावी घेऊन जायचा.नंबर प्लेटवरील नंबर बदलून टाकायचा. बनावट चाबी लावून दुचाकी चोरी करायचा.सुभाषची जर कसून चौकशी केली तर त्याच्याकडून अनेक दुचाकी चोरीचा छडा लागू शकतो असा पोलिसांना विश्वास आहे .

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संजय पुजलवार, पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय आत्राम, सपोनि प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे, अन्सार बेग, प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, किरण पडघन, अश्‍विन पवार,मिलिंद कांबळे, समाधान कांबळे, गौरव ठाकरे, रवी नेवारे, अंकुश फेंडर, गौतम मनवर, मलनस आदींनी केली.