येवला,कोपरगाव परिसरात महामार्गावर अन सराफास लुटणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद

886

येवला व कोपरगाव तालुका परिसरात महामार्गावर जबरी लूटमार करण्यासह कोपरगाव मधील सराफाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 3 गुन्हे उघड झाले असून 9 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड ते नगर महामार्गावर मोटर सायकलस्वारांना अडवून लूटमार करणारे काही गुन्हेगार हे येवला बसस्टॅण्ड परिसरात आले असल्याची बातमी मिळाली. पोलिसांच्या पथकाने येवला बसस्टॅण्ड परिसरात सापळा रचून संशयित अमोल शांताराम शिंदे (रा. उंदिरवाडी, ता. येवला) व निखिल विजयराव मिसाळ (रा.कोपरगाव) यांना शिताफीने ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता,त्यांनी त्यांचे साथीदार सुधिर कडुबाळ सरकाळे (रा.शहर टाकळी, ता.शेवगाव, जि.अहमदनगर), किरण नवनाथ गायकवाड, राजु बाळु गुंजाळ, (दोघे रा. उक्कलगाव,ता.श्रीरामपुर, जि. नगर) यांच्यासह येवला तालुका परिसरात नोव्हेंबरमध्ये गवंडगाव शिवारात एका मोटर सायकलस्वाराला लुटल्याचे कबूल केले. त्या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याच्या गळयातील सोन्याची चेन, मोबाईल फोन, रोख व बजाज डिस्कव्हर दुचाकी जबरीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

यातील आरोपी निखिल मिसाळ याच्या ताब्यात चोरीला गेलेला रेडमी नोट 5 प्रो मोबाईल फोन आढळून आला असून सोन्याची चेन त्याने कोपरगाव येथील केदार सुधाकर जाधव याला विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याच्या समांतर तपासात आरोपी अमोल शिंदे व निखिल मिसाळ यांना अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदार सुधिर सरकाळे, किरण गायकवाड, राजु गुंजाळ व गोविंद बाळु गुजाळ (रा.उक्कलगाव,ता.श्रीरामपुर) यांच्यासह आणखी काही गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींनी गेल्या डिसेंबर व जानेवारी महिन्यात येवला तालुका व कोपरगाव शहरात महामार्गावरील दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रूपये व मोबाईल फोन लुटमार केल्याचे उघडकीस आलेले आहे.

यातील आरोपी निखिल मिसाळ व गोविंद गुंजाळ यांनी कोपरगाव येथील सराफा व्यावसायिक महेंद्र कुलकर्णी यांना लुटण्यासाठी पाळत ठेवून त्यांच्या घरी जाण्याच्या मार्गावर पुणतांबे कोपरगाव फाटा परिसरात चाकूचा धाक दाखवून 2 लाख 60 रूपये किमतीचे सोने लुटले होते. सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेला आरोपी निखिल मिसाळ याने रेकी करून त्याचे साथीदारांचे मदतीने सराफा व्यावसायिकास लुटले व चोरीचे सोने विक्री करून आपसात पैसे वाटून घेतल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून 3 गुन्ह्यांमध्ये लुटमार करून नेलेले 9 तोळे सोने (सोन्याच्या लगड) व मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 77 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी येवला शहरातील नाकोड पैठणी दुकान घरफोडी, तसेच येवला, कोपरगाव, राहता, श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या