छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी घडवले, योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींनी घडविले, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आहे.

गोविंद गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ आळंदी येथे आले होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा झाली, परंतु मी जाणून आहे जोपर्यंत प्रभू श्रीरामासोबत प्रभू श्री कृष्णाची प्राणप्रतिष्ठापणा होत नाही तोपर्यंत आपल्याला विश्रांती मिळणार नाही. बाबा विश्वनाथाने आपला चमत्कार दाखवलेलाच आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराजांना कोणी घडवले हे जगाला माहीत आहे
आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या पाठीमागे राजमाता जिजाऊ यांचा हात आहे. व्यक्तिमत्त्व घडवणे, दिशा देणे हे काम राजमाता जिजाऊ यांनी केले हे संपूर्ण जगाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतःचे कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा खोडून काढला.