विजेचा धक्का लागून चाटेवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

523

महावितरणच्या डीपीवर चढल्याने वीज वाहिनीच्या वीज प्रवाहाचा जबरदस्त धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चाटेवाडी (ता.जळकोट) येथे घडली आहे. बालाजी बाबुराव चाटे (वय 32) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

चाटेवाडी येथील तलावाशेजारी असलेल्या महावितरणच्या डीपीवर बालाजी चाटे हे आज सकाळी चढले होते. त्यावेळी त्यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागला आणि ते जागेवरच गतप्राण झाले. महावितरणचे अधिकारी व जळकोट पोलीस यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत बालाजी चाटे यांचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र, वांजरवाडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी दिली.

महावितरणचे सहाय्यक अभियंता एस.व्ही. दहिफळे यांच्याशी याबाबत संपर्क साधून घटनेचे कारण विचारले असता त्यांनी ११ केव्ही तारेचा डोक्याला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची माहिती दिली. मयत गृहस्थ डीपीवर का चढले होते, असे विचारले असता त्यांचे कुटुंबीय सध्या दु:खात आहेत. त्यामुळे यामागील कारण कळू शकले नसल्याची माहितीही दहिफळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या