‘शेतकऱ्याचा जन्म नको’ म्हणत कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; पंढरपूर तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली आहे. कर्जबाजारीपणा, शेतातील कृषीपंपाची वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणी आदी कारणांना कंटाळून तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. सुरज जाधव रा. मगरवाडी (ता.पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडीओही बनवला आहे.

मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकर्‍याने बुधवारी स्वत:च्या शेतात डिपीजवळ विषारी औषध प्राशन केले होते. त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी सुरज जाधव यांचा मृत्यू झाला. सुरज यांनी विषारी औषध प्राशन करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला आहे. या चित्रीत केलेल्या व्हिडीओत शेतकर्‍यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही. आपले आयुष्य इथपर्यंतच होते. इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या जन्माला आपण येणार नाही. सरकार कधी शेतकर्‍याच्या नादाला लागत नाही. सरकार शेतकर्‍याचा कधी विचार करत नाही, असे म्हणत त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती कुटुंबियांना व्हिडीओमुळे समजली. त्यानंतर कुटुंबियानी शेतात धाव घेतली. त्यांना तात्काळ पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सूरज जाधव या शेतकर्‍याच्या शेतातील डिपीवरील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे हातातोंडाला आलेली पिके हातातून जातील. झालेले 16 ते 20 लाख रुपये कर्ज कसे फेडायचे याची भिती सुरजला सतावत होती. याच कारणामूळे सुरज या तरुन शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. सुरजने आत्महत्या केल्यामूळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यावर मगरवाडी येथे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरज यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.