
मुळा नदीपात्राजवळील नावघाट स्मशानभूमी परिसरात राहुरीतील तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या, याचा तपास पोलीस करीत आहेत. विजय बोबडे (वय 29, रा. भुजाडी इस्टेट, राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत विजयाचा मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक खोंडे, पोलीस नाईक शिवाजी खरात, नदीम शेख, दिगंबर सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्याचे पाय जमिनीला टेकलेले होते. तसेच डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडचे वार दिसून आल्याने विजयची आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. राहुरी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. पोलीस नाईक प्रवीण खंडागळे तपास करीत आहेत.































































