
अमेरिका–इस्त्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर इराणने आखाती देशांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई)वर क्षेपणास्त्र डागण्यात आले. यानंतर यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी इराणवर तीव्र शब्दांत टीका केली. “इराणने शहाणपणाने वागावे; तुमचे युद्ध शेजारी राष्ट्रांशी नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार अन्वर गर्गाश म्हणाले, “आखाती देशांवर केलेला इराणी हल्ला ही गंभीर चूक ठरली असून महत्त्वाच्या टप्प्यावर इराण अधिकच एकाकी झाला आहे. शहाणपणाने निर्णय घ्या आणि शेजाऱ्यांशी जबाबदारीने वागा; अन्यथा अलगाव आणि तणावाचा दुष्टचक्र वाढत जाईल.”
अबू धाबीतील अल-धारफा तळावर हल्ला
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर इराणने यूएईतील अनेक प्रांतांना लक्ष्य केले. शनिवारी अबू धाबीच्या दक्षिण भागातील अल-धारफा येथील अमेरिकन तळावर इराणी क्षेपणास्त्र कोसळले. त्याच दिवशी अबू धाबीतील इतर भागांनाही धक्के बसले.
दुबईत स्फोट, हवाई क्षेत्र बंद
अमेरिकन तळ नसतानाही जागतिक व्यावसायिक केंद्र मानल्या जाणाऱ्या दुबईवरही हल्ला झाला. त्यानंतर शहराचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आणि आखाती प्रदेशात व्यापक अडथळे निर्माण झाले. दुबईत पाच मोठे स्फोट झाले असून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकसान झाले. उड्डाणांवर परिणाम झाला आणि चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.
यूएईपुरतेच नव्हे, तर इतर आखाती देशांनाही या तणावाचा फटका बसला. रविवारी दुबई आणि कतारची राजधानी दोहा येथे मोठे स्फोट ऐकू आले. ओमानलाही प्रथमच या संघर्षाचा फटका बसला. अमेरिका आणि इस्त्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने शेजारील आखाती देशांवर हल्ल्यांची व्याप्ती वाढवली आहे.
अन्वर गर्गाश यांनी पुन्हा ठाम शब्दांत सांगितले की, या हल्ल्यांमुळे इराण आखाती शेजाऱ्यांपासून अधिकच दूर गेले आहे. सध्याच्या परिस्थितीत आखाती प्रदेशात तणाव उच्चांकावर पोहोचला असून जागतिक स्तरावरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.





























































