भोजपुरी अभिनेत्रीसोबत ओलीस नाट्य, माथेफिरूने केली लग्नाची बळजबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एका चित्रपटाला शोभेल असे ओलीस नाट्य उत्तर प्रदेशच्या रॉबर्ट्सगंज भागात घडले आहे. एका माथेफिरू तरुणाने एका भोजपुरी अभिनेत्रीला ओलीस ठेवले आणि लग्नासाठी बळजबरी केले. या घडामोडीत माथेफिरू तरुणाने अभिनेत्रीवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी प्रयत्नांची पाराकाष्ठा करत अभिनेत्रीला या माथेफिरुच्या तावडीतून सोडवले.

रितु सिंह ही भोजपुरी अभिनेत्री 70 लोकांसह मुंबईहून उत्तर प्रदेशमध्ये गेली. रितु सिंह ‘अभागन बिटिया’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रॉबट्सगंजमध्ये पोहोचली. या 70 लोकांची टीम वेगेवळ्या तीन हॉटेलमध्ये थांबली होती. पंकज यादव हा तरुण गेली तीन वर्षे रितुच्या मागावर होता. पंकज रितुच्या खोलीमध्ये जबरदस्तीने घुसला आणि लग्नासाठी मागणी घालू लागला. रितुने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला. हॉटेलमधील लोकांना ही बाब कळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना पाचारण केले.

माथेफिरू तरुणाकडे पिस्तुल होते. एका उपस्थित तरुणाने जेव्हा रितुला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या माथेफिरूने या तरुणावर गोळी झाडली. नंतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. पंकज म्हणत होता की रितुने आपल्या घरच्यांशी लग्नाबाबत बोलणी करावी. बोलत असताना पंकजने पोलिसांवाच गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी लागली नाही. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला धरले आणि बेड्या घालून अटक केली.