
एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर माथेफिरूने चाकूहल्ला केल्याच्या घटनेने आज पोलादपूर तालुका हादरून गेला. मुंबई-गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थनगरच्या निर्जन रस्त्यावर थरकाप उडवणारा हा प्रकार घडला. कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत ही तरुणी येथे उभी असतानाच अचानक आलेल्या माथेफिरूने तिच्या हातावर, चेहऱयावर, खांद्यावर चाकूने वार केला. एवढय़ावरच तो थांबला नाही तर त्याने तरुणीच्या पाठीत हत्यार खुपसून पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडताच रस्त्यावरील लोकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तिला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे सुदैवाने तिचे प्राण वाचले.
शुभम वनारसे (21) असे या आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील दत्तवाडी कातळी येथील रहिवासी असलेल्या शुभमचे सुंदरराव मोरे महाविद्यायात शिकणाऱया एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. बोलण्याचा बहाणा करून त्याने तिला दुपारी एकच्या सुमारास सावंतकोंड येथील समर्थनगरच्या निर्जन रस्त्यावर बोलावले. त्यामुळे ती आपल्या मैत्रिणीसोबत तेथे गेली असताआरोपी शुभमने पीडितेच्या हातावर, खांद्यावर आणि चेहऱयावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच एक हत्यार तिच्या पाठीत खुपसले. मैत्रिणीने आरडाओरडा केल्यामुळे तेथे गर्दी जमा झाली. त्याचा फायदा घेत आरोपी शुभम वनारसे फरार झाला.
आरोपीचा माथेफिरू रेकॉर्ड
आरोपी शुभम वनारसे याने यापूर्वीही एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारी कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमाला नकार दिला म्हणून एका शाळकरी मुलीच्या गुरांचा वाडा त्याने जाळल्याचा प्रकार समोर आला आहे, तर पाच महिन्यांपूर्वी शहरातील आरओ पाणी सप्लायच्या व्यवसायामध्ये त्याने गैरवर्तनही केल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. प्रत्येकवेळी गुन्हेगारी कारवाया केल्यानंतरही त्याला अभय मिळत आल्याने त्याची हिम्मत वाढली आणि आज त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान घटनास्थळी सदर माथेफिरूचा मोबाईल सापडला असून त्याला बेडय़ा घालण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.


























































