
सामना प्रतिनिधी । मुजफ्फरनगर
वाढलेल्या बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारल्यामुळे ‘भक्तां’चा कोप झाल्याची घटना उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगरमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात घडली. प्रश्न विचारणार्या तराला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम चोपले. त्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात काही लोक तरुणाला दहशतवादी म्हणताना दिसत आहेत. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव अदनान आहे. तो बारावीचा विद्यार्थी आहे. कंपनी गार्डन येथे एका टीव्ही चॅनेलने चर्चेचा कार्यक्रम ठेवला होता. पत्रकार नरेंद्र प्रताप हे अँकर होते. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या काळात समस्या सुटल्या का? असा प्रश्न ते जनतेला विचारत होते. हाच प्रश्न त्यांनी अदनानला विचारला. अदनानने उत्तर प्रदेशसह देशात बेरोजगारी वाढल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत असे तो म्हणाला. यामुळे भाजप कार्यकर्ते संतापले. 25 ते 30 जणांनी अदनानला बेदम मारहाण केली. यावेळी टी.व्ही. कॅमेरा ऑन होता. मारहाण करताना काहीजण अदनानला दहशतवादी म्हणत होते. बुधवारच्या या घटनेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

























































