
सामना ऑनलाईन । हैदराबाद
ऑनलाईन विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या पबजी या खेळामुळे एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सलग 45 दिवस पबजी खेळल्यामुळे त्याची मान सुजून त्याचा मृत्यू ओढवला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगाणातील जगतियाल या शहरात हा तरुण राहत होता. त्याला पबजीचं व्यसन होतं. त्या व्यसनापायी तो सलग 45 दिवस पबजी खेळत होता. या दरम्यान मानेची हालचाल न झाल्याने मानेतील धमन्यांना सूज आली. त्याला मान वळवताही येत नव्हती. सूज आल्यामुळे त्याच्या मानेत वेदना सुरू झाल्या. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला.
पबजीमुळे मृत्यू झाल्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. यापूर्वीही हिंगोलीमध्ये पबजी खेळताना चुकून रेल्वे रुळावर आल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. पबजीचे दुष्परिणाम समोर येत असल्यामुळे पबजीवर बंदी आणण्याची मागणी होत आहे.






























































