नगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard-cidco-aurangabad

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात करमाळ्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री कर्जत तालुक्यातील शेगूड परिसरात गुरुवारी रात्री घडली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्याच्या हद्दीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण फुंदे (वय 35, फुंदेवाडी, ता. करमाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यात यापूर्वी बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतला होता. त्यानंतर हा बिबट्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेला होता. तेथेही त्याने पाचजणांचा बळी घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून कर्जत तालुक्याच्या अनेक भागांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू होती.

गुरुवारी रात्री कल्याण हा आपल्या शेतात पिकांना पाणी देत होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कल्याणवर मागून हल्ला केला. यानंतर बिबट्याने त्याला शेजारच्या शेतात नेऊन ठार केले.

या घटनेची माहिती समजताच तातडीने तरुणाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, कर्जत-करमाळा रस्त्यालगतच्या राधेश्याम मंगल कार्यालयाजवळ रात्री 9 वाजता बिबट्या आढळला असून, तो कोरेगावच्या दिशेने गेल्याची माहिती महेश जगताप यांनी दिली.