
सामना प्रतिनिधी । मालवण
आचरा वरचीवडी येथे कलम बागेत जखमी अवस्थेत पडलेल्या घुबडाला तीन युवकांनी जीवदान देत वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. वरचीवाडी येथील प्रफुल्ल घाडी व त्यांचे मित्र जितेंद्र घाडी, नीलेश घाडी यांना घराला लागूनच असलेल्या कलम बागेत जोरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. पाहण्यासाठी गेले असता त्यांना एक मोठ्या आकाराचे घुबड जखमी अवस्थेत दिसले. कुत्रे त्या जखमी घुबडावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात भुंकत होते.
अशा स्थितीत युवकांनी घुबडाला उचलून सुरक्षित ठिकाणी आणत पाणी पाजले. जखमी घुबड मिळाल्याची माहिती पत्रकार परेश सावंत यांनी कंदळगाव वनविभागाचे वनरक्षक विजय पांचाळ यांना दिली. वनरक्षक पांचाळ यांनी घुबडाची पाहणी करून पुढील उपचारासाठी त्या घुबडाला ताब्यात घेतले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमी घुबडावर उपचार केले जाणार आहेत. दुर्मिळ होत चाललेल्या घुबड जातीच्या पक्षाला जीवदान देण्याचे काम करणाऱ्या आचरा येथील युवकांचे कौतुक होत आहे.































































