फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार; अल्पवयीन ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीनांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात ही घटना घडली असून यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजवून दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी अल्पवयीनांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अब्दुल अमीरउल्ला खान (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल आणि हल्लेखोर अल्पवयीन मुले एकाच भागात राहायला आहेत. फुटबॉल खेळताना त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे आरोपींच्या मनात अब्दुलविषयी राग होता. अब्दुल आणि मित्र महेश मिश्रा व आयुष दुचाकीवरुन येरवडा परिसरातून चालले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलांनी दुचाकीस्वार अब्दुलला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर खान याचा मित्र मिश्राला बांबुने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी हल्लेखोर अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.