
सामना ऑनलाईन । मुंबई
वडिलांनी उत्तम संगीताची झळाळती वाट निर्माण केली. त्याला विविध सकारात्मक प्रयोगांची जोड दिली जात आहे. आता शुक्रताराचे यूटय़ूब चॅनल असणार आहे.
आज गाण्यांचे कार्यक्रम खूप लोकप्रिय होत आहेत. विविध नाटय़गृहांमध्ये असे वेगवेगळय़ा विषयांवर वाहिलेले कार्यक्रम ‘हाऊसफुल’चे बोर्ड पाहत आहेत. अर्थात प्रेक्षकांना, रसिकांना ते आवडत आहेत. यातून हेच सिद्ध होत आहे. काही कार्यक्रम तद्दन व्यावसायिक असतात तर काही कार्यक्रम मराठी साहित्य, संस्कृती, इतिहास रसिकांसमोर मांडून दर्जेदार करमणूक उपलब्ध करून देत आहेत. असे कार्यक्रम सादर करणाऱयांपैकी एक नाव म्हणजे ‘अतुल दाते’.
‘माणिक एण्टरटेन्मेंट’ ही कंपनी काढून अतुल दाते यांनी संगीत क्षेत्रात चांगले सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले. अरुण दाते यांनी 55 वर्षे मराठी मनात रुजवलेला ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम ‘नवा शुक्रतारा’ या नावाने सुरू केला. मंदार आपटे, श्रीरंग भावे या उभरत्या गायकांसोबत काही दर्जेदार नवीन कवींच्या कविताही रसिकांसमोर आणण्याचे काम सुरू ठेवले.
‘महाकवी सावरकर’ सावरकर देशभक्त म्हणून जास्त परिचित आहेत. पण ते हाडाचे कवी होते. तर सावरकरांचे माहीत नसलेले पोवाडे, भावगीतं तसेच सावरकरांविषयीची वेगळीच रोमांचक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे दुबईतही ‘सावरकर साहित्य’ रसिकांसाठी खुले करून दिले आहे.
जी. एन. जोशी, गजानन वाटवे, अरुण दाते अशा महान गायकांनी चित्रपटात नसूनसुद्धा लोकप्रिय झालेली अनेक गाणी आपल्याला दिली होती. भावसंगीताचा इतिहास सांगताना कार्यक्रमाची निर्मितीसुद्धा अतुल दातेंनी केली आहे. घरीच भावगीतांचा चालताबोलता इतिहास पाहायला मिळाल्यामुळे या कार्यक्रमाचे निवेदनही अतुल दाते करतात.
नवनवीन गायकांना बऱयाच संधी मिळतात. परंतु नवनवीन निवेदक, मुख्यत्वे चांगले कवी तयार व्हावेत म्हणून त्यांनी ‘अरुण दाते ऍकेडमी’ स्थापना केली. गेली दोन-तीन वर्षे नवोदित निवेदक, कवींसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यंदा अरुण दातेंच्या पुण्यतिथीला नवीन युगल भावगीतांची स्पर्धा ते घेणार आहेत. हेतू हाच की राज्यभरातून उदयोन्मुख गायक व कवी लोकांसमोर यावेत. चांगली, दर्जेदार गीतं, कविता पुढे आल्या तर चांगली भावगीतं रसिकांना मिळू शकतील हाच यामागचा हेतू आहे.
यूटय़ुब चॅनेल – नवा उपक्रम
सध्या आणखी एक उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. तो म्हणजे अरुण दाते यांच्या गीतांचे ‘यूटय़ुब चॅनेल’. अरुण दाते स्वतः रसिकाग्रणी असल्यामुळे खूप चोखंदळ होते. त्यामुळे उत्तम शब्द, उत्तम कविता असेल तरंच दाते ती घेत असत. शुक्रतारा, भातुकलीच्या खेळामधलीसारखी मोजकी गाणी ते गायले, पण प्रत्येक गाणं अजरामर झालं. त्यामुळे ही सर्व गाणी सहज उपलब्ध व्हावी म्हणून त्यांच्या गाण्यांचे यूटय़ुब चॅनेलही अतुल यांनी सुरू केला आहे. अशा तऱहेने मराठीतील साहित्य, संगीत काव्य, गायन क्षेत्रातील ‘जे जे उत्तम, उदात्त उन्नत’ आहे ते ते सर्व आपल्या कार्यक्रमांतून रसिकांसमोर मांडण्याचा अतुल दाते यांनी प्रयत्न केला आहे.




























































