
पुणे शहरात मिंध्यांकडून झालेल्या बॅनरबाजीची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवासेनेकडून अक्षरशः धुलाई करण्यात आली. मी आणि माझा बबड्या… ही शाहसेना ‘हुजरेगिरी’वर चालते. ‘काली दाढीवाला मेरा लकी कबूतर,’ असे व्यंगचित्र आणि बॅनर झळकावून सडेतोड उत्तर दिले. हे फलक पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
युवासेनेच्या वतीने शहराचा दर्शनी भाग असलेल्या लकडी पुलावर ‘अशी ही बनवाबनवी नवीन घराणेशाही,’ असे होर्डिंग लावण्यात आले असून, त्यामध्ये मी आणि माझा बबड्या याबद्दलचे व्यंगचित्र रेखाटले आहे. सुरत, गुवाहाटीमार्गे खोका खाऊन, गद्दारी करून चोरपावलांनी आलेली ही ढोकळा फाफडा घराणेशाही अशा शब्दांत युवा सेनेचे शहर अधिकारी राम थरकुडे आणि शहर समन्वयक युवराज पारिख यांनी मिंध्यांना सुनावले आहे.
शास्त्री रोडवरील गांजवे चौकामध्ये ही शाहसेना ‘हुजरेगिरी’ वर चालते, असा मजकूर लिहून त्यावर व्यंगचित्र रेखाटले आहे. ‘काली दाढीवाला मेरा लकी कबूतर,’ असे म्हणत अमित शहा मिंध्यांना बोटावर खेळवत असल्याचा संदर्भ देण्यात आला आहे. शिवसेना कसबा विभागप्रमुख चंदन साळुंखे यांनी हा फलक लावला आहे. मिंध्यांना दिलेल्या या सडेतोड उत्तराची शहरात चर्चा होत आहे.