भरती विक्रोळीत, पण मुलाखती हरयाणातील गुरुग्रामात ठेवणाऱया विक्रोळी पश्चिम येथील बर्नस् ऍण्ड मॅक्डोनल कंपनीला युवासेनेने जोरदार दणका दिला. या कंपनीवर धडक देत युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला. या आंदोलनामुळे हादरलेल्या कंपनी प्रशासनाने गुरुग्राम येथील मुलाखती रद्द करून त्या स्थानिक पातळीवर घेण्याचे मान्य केले. तसेच कंपनीत 80 टक्के भूमिपुत्रांचीच भरती केली जाईल, अशी ग्वाही दिली.
विक्रोळी पश्चिम येथे बर्नस् ऍण्ड मॅक्डोनल कंपनीचे कार्यालय आहे. या मुंबईतील कार्यालयात अभियांत्रिकी विभागात भरती होणार असून त्यासाठी मुलाखती मात्र हरयाणा येथील गुरुग्राममध्ये शनिवारी 14 व रविवारी 15 मार्च रोजी होणार होत्या. याबाबतची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावरही प्रसारित करण्यात आली. याची गंभीर दखल युवासेनेने घेतली. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव योगेश पेडणेकर, विभाग अधिकारी अभिषेक मोरे, विधानसभा चिटणीस दत्ताराम रिंगे यांच्यासह शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. उपविभाग अधिकारी प्रसाद इंदुलकर, समन्वयक गणेश डोंगरे, पवन राजपूत, विभाग संघटक चैतन्य राऊत, शाखा अधिकारी अजय मंडलिक, सागर फुलसुंदर, प्रसाद कविस्कर, वैभव तांबोळी, मयूर गाढवे, आदित्य कंद, सत्यम मिश्रा, स्वप्नील साबळे, राहुल आयरे, धनंजय पराडकर यावेळी उपस्थित होते






























































