
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील वसतिगृह, कँटीन आणि मेसमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक पुरेशा सुविधा नाहीत. सीसीटीव्ही नाहीत. दररोज हजारो विद्यार्थी येणाऱ्या ‘आयडॉल’मध्ये तर कँटीनच नाही. त्यामुळे विद्यापीठाचे वसतिगृह, कँटीन, मेसमध्ये सुविधा द्या आणि सीसीटीव्ही लावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील वसतिगृह, मेस, कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, धनराज कोहचडे, मयूर पांचाळ, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि युवासेना मुंबई समन्वयक किरण फाटक यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवादही साधण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील हे मुलांचे एकमेव वसतिगृह असून या ठिकाणच्या सुविधांकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले. कँटीन-मेसच्या मागील परिसरात दुर्गंधीयुक्त आणि टाकाऊ वस्तू ठेवल्या असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर वसतिगृहाची अग्निरोधक व्यवस्था सुधारणेही आवश्यक आहे.
अशी आहे स्थिती
आंतरराष्ट्रीय मुलांच्या वसतिगृहात २०० विद्यार्थ्यांची क्षमता असताना फक्त ४० विद्यार्थी असल्यामुळे मेस अथवा कँटीन सुविधा उपलब्ध नाही. सेंटर फॉर बेसिक सायन्सेस येथील कँटीन नुकतेच सुरू झाले आहे. या सुविधा आंतरराष्ट्रीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहेत. वरील सर्व आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात याकरिता शासनाने गठीत केलेल्या समितीमध्ये शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आहेत. त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले आहे. महर्षी केशव धोंडो कर्वे मुलींच्या वसतिगृहात फक्त ४३ विद्यार्थिनी आहेत; परंतु येथे मेस सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना साध्वी सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्ये जावे लागते. मात्र दोन्ही वसतिगृहांच्या मधल्या परिसरात सीसीटीव्ही नाहीत.



























































