भाषा आणि समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत गुण मिळाल्याने दहावीचा निकाल वाढला. हे अंतर्गत गुण युवा सेनेच्या प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. शिक्षण मंडळाने गुणवत्तेच्या नावाखाली 2018-19 मध्ये दहावीतील विद्यार्थ्यांना भाषा व समाजशास्त्र विषयांमध्ये तोंडी परीक्षेद्वारे मिळणारे अंतर्गत गुण रद्द करून 100 गुणांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचे गुण कमी होण्यावर झाला आणि अनेक जण चांगल्या महाविद्यालयामध्ये अकरावी प्रवेशापासून वंचित राहिले होते.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना व युवासेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. ऑनलाईन याचिकेद्वारे सह्यांची मोहीमही राबवण्यात आली होती. त्यानंतरही दखल घेतली न गेल्याने 31 जानेवारी 2019 रोजी शिक्षण मंडळाच्या पुणे मुख्यालयावर युवासेनेने आंदोलन केले होते. 12 जून 2019 रोजी आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे अंतर्गत गुण पुन्हा समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यामुळेच ते गुण समाविष्ट केले गेले आणि त्याचा परिणाम आजच्या निकालामध्ये दिसून येत आहे.


























































