सामना प्रतिनिधी, मुंबई
विद्यार्थ्यांकडून अवाच्या सव्वा फी घेऊनसुद्धा त्यांना चांगल्या सोयीसुविधा न पुरविणाऱया मालाड येथील घनश्याम सराफ महाविद्यालयावर युवा सेनेने धडक दिली. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणाऱया विविध समस्यांबाबत युवा सेनेकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत युवा सेनेने आज जोरदार आंदोलन केले.
युटिलीटी फी, डेव्हलपमेंट फी, मॅगझीन फी, इतर खर्च, कल्चरल ऑक्टिव्हिटीज फीच्या नावाखाली सराफ महाविद्यालयाने लूट चालविली होती. विद्यार्थी-पालकांचा खिसा कापणारी ही फी रद्द करा, अशी मागणी या वेळी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. युवा सेनेने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या भावना वैद्य यांच्याकडे दिले असून त्यांनी याप्रकरणी बारा दिवसांत लेखी स्वरूपात उत्तर देण्याचे आश्वासन युवा सेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नाडिस, युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शीतल देवरुखकर-शेठ, सुप्रिया करंडे, निखिल जाधव, मिलिंद साटम, धनराज कोहचाडे, वैभव थोरात तसेच युवा सेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, रूपेश कदम, विभाग युवा अधिकारी रोहन शिंदे, अमित पेडणेकर आदी उपस्थित होते.
जिमखाना केवळ नावापुरताच
या विद्यार्थ्यांकडून जिमखाना फी घेतली जाते. पण प्रत्यक्षात जिमखान्यात कोणत्याही सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. प्रसाधनगृह आणि कॅण्टीनची देखील अत्यंत वाईट स्थिती आहे. एनएसएस आणि एससीसी कमिटीसाठीदेखील स्वतंत्र खोलीची व्यवस्था नसून दोन्ही कमिटीसाठी स्वतंत्र खोल्या देण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. सेल्फ फायनान्स कोर्सची फी मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार घ्यावी. विद्यार्थिनींसाठी सुसज्ज कॉमन रूमची व्यवस्था करावी, अशा मागण्याही युवा सेनेने केल्या आहेत.




























































