
सामना प्रतिनिधी । नगर
‘शिवसेनेचा आवाज बुलंद आहे व तो बुलंदच राहणार. शिवसेनेच्या मजबूत पक्षबांधणीमुळे मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेसमोर कोणताही पक्ष आणि संघटना टिकू शकत नाही. शिवसैनिकांचे एक जाळे निर्माण झालेले आहे. त्याच पध्दतीने नगर शहर आणि जिल्ह्यात युवा सेनेची बांधणी करण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे गाव तेथे शाखा अशा पध्दतीने युवा सेनेची बांधणी जिल्ह्यात करावी’, असे आवाहन युवा सेनेचे राय सचिव वरुण सरदेसाई यांनी केले आहे. युवा सेनेचा जिल्हा मेळावा सोमवारी हॉटेल यश ग्रँड येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे रायाचे सहसचिव तथा नगरचे संपर्कप्रमुख सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना वरुण सरदेसाई म्हणाले की, ‘नगरमध्ये केडगाव येथे शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांडची घृणास्पद घटना घडली. या घटनेची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. या मृत शिवसैनिकांच्या कुटूंबियांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी राहीली. पक्षाचे नेतृत्व आपल्यामागे भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे पक्ष आणि संघटना बांधणीवर शिवसैनिक व युवा कार्यकर्त्यांनी भर दिला पाहिजे. युवा सेनेत तरुणांना अधिक संधी दिली जाईल. युवा सेनेच्या बांधणीचे सर्व श्रेय संघटना प्रमुख आदित्य ठाकरे यांना जाते असे सरदेसाई म्हणाले. शिवसेना लढाऊ संघटना आहे, दिखाऊ नाही. लढण्याची ताकत केवळ शिवसेनेतच आहे. सत्ता असतानाही जनतेबरोबर राहण्याचे धाडस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीच दाखविले आहे. तरुणांची सर्वात मोठी फळी शिवसेनेकडे आहे. वडापाव खाऊन निवडणूका लढवण्याची किमया शिवसैनिकांनी करुन दाखविली आहे.’
मुंबई, ठाण्यातील निवडणुकांमध्ये युवासेनेचे मोठे योगदान आहे. त्याच पध्दतीने जिल्ह्यातही काम करायचे असून गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत भगवा फडकावण्याचे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करायचे आहे असे शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले. युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी नगर जिल्ह्यातील युवकांचे अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी दोन महिन्यातून एकदा युवकांचा मेळावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यातून अनेक समस्या सोडवता येतील असे सांगितले.






























































