
सामना प्रतिनिधी । बीड
कडाक्याची थंडी असतानाही नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवात आयोजीत केलेल्या चित्रकला स्पर्धेत सहभागी होत उदंड प्रतिसाद दिला. हळूवार कुंचल्यातून प्राथमिक ते माध्यमिक गटातील मुला-मुलींनी विविध रंगांच्या माध्यमातून आपले भावविश्व ड्राईंग पेपरवर साकारले. या स्पर्धेत बीड शहरातील जवळपास वीस शाळांचे 800 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
बीड येथील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या 15 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात मंगळवारी दि.1 जानेवारी 2019 रोजी सकाळच्या सत्रात स्व. शक्तीकुमार केंडे यांच्या स्मरणार्थ शक्ती प्रतिष्ठान आणि स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने 1 ली ते 7 वी या बालगटासाठी तसेच 8 ते 12 या माध्यमीक गटासाठी चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या.सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या विषयावर हळूवार कुंचल्यातून रंगरेषाच्या माध्यमातून भावविश्व साकारले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय केंडे, सचिव श्रीमती मंगलाताई केंडे, सौ.भाग्यश्री वैद्य, खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी महाराज, माजी मुख्याध्यापक हौसराज पवार, मुख्याध्यापक जे.बी.कुलकर्णी, संयोजक एस.एस.क्षीरसागर, प्रा.श्रीकांत पुरी यांच्यासह जाधव सर, डॉ.विजय क्षीरसागर, सुहास पालीमकर, लक्ष्मीकांत खडकीकर, गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल, सुजीत गिराम,शुभम खटोड, आशिष खटोड, महेंद्र बुंदेले, धर्मराज मागदे आदी उपस्थित होते. अनंत कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील आदर्श माध्यमिक विद्यालय, मिल्लिया हायस्कुल,कै.बि.दे.राठी राजस्थानी विद्यालय, शिवाजी विद्यालय, विनायक मा. विद्यालय, स्वा.सावरकर विद्यालय, शरदचंद्र विद्या मंदिर, शारदा विद्यामंदिर, गिता कन्या विद्यालय, संस्कार विद्यालय, चंपावती विद्यालय, जिजामाता प्रा.विद्यालय, जि.प.मा.शाळा गांधीनगर, आर्युमंगलम् निवासी मुकबधिर विद्यालय, अलहुदा उर्दू हायस्कुल यांच्यासह इतर शाळा तसेच ए.जी.ड्राईंग क्लासेसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.सकाळी 10 ते 1 या वेळेत या स्पर्धा कीर्तन सभामंडपात पार पडल्या.
































































