घरचं जेवण, कमी साखर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज

अभिनेत्री पल्लवी पाटील फुडी असल्याने तिचा प्रत्येक दिवसाचा आहार ठरलेला नसतो. तिला जे आवडेल ते ती खाते. घरचं जेवण  आणि कमी साखर हा पल्लवीचा फिटनेस फंडा!

अभिनेत्री पल्लवी अजय पाटील हिचा  फिटनेस कमालीचा आहे. ती फिटनेस सांभाळण्यासाठी योगाव्यातिरिक्त इतर कोणत्याच गोष्टींना महत्त्व देत नाही. खाण्याच्या-पिण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पल्लवी शक्यतो साखर पोटात जाणार नाही याची काळजी घेते. त्यामुळे पल्लवीने तिच्या आहारातील चहा, कॉफी या पदार्थांवर जवळ जवळ बंदीच आणली असं म्हणायला हरकत नाही. ती म्हणते, जितपं जमेल तितपं घरचं खाण्यावर भर दिला गेला पाहिजे. सततचे सुरू असणारे प्रयोग, वेळी अवेळी असणारे शूट यामुळे बऱयाचदा काहीच पर्याय नसल्यावर बाहेरचं खावंच लागतं, पण आपल्या शरीरासाठी काय योग्य, हानीकारक आहे याची काळजी आपणच घेतली पाहिजे.

पल्लवी फुडी असल्याने तिचा प्रत्येक दिवसाचा आहार ठरलेला नसतो. आहार कुठलाही असला तरी ताक मात्र जेवताना फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठून गरम पाण्यातून तूप पिणं, जेवून झाल्यावर किंवा जेवणाआधी किमान अर्धा तास पाणी न पिणं अशा अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री जितपं जमेल तितक लवकर जेवलं पाहिजे. रात्रीचा आहार हा हलका असावा, पण बहुतेकदा रात्री जास्त जेवावंसं वाटतं, पण शरीरासाठी ते फार हानीकारक आहे. लवकर जेवल्याने झोपेपर्यंत बरीच हालचाल झालेली असते. पल्लवी म्हणते, रात्री जर का जास्तच भूक लागली असेल तर मूठभर सूर्यफुलाच्या बिया किंवा 10 बदाम जरी खाल्ले तरी भूक नाहीशी होते आणि शरीरासाठीसुद्धा पौष्टिक.

कधीही कोल्हापूरला जाणं झालं तर तिथल्या एका हॉटेलमधील तांबडा, पांढरा रस्सा न खाताच येणं म्हणजे पल्लवीसाठी अशक्यच. पल्लवीला अजिबातच पिझ्झा, बर्गर, इटालियन, चायनीज असे फूड आवडत नाहीत. पुरणपोळी, कटाची आमटी, वरणभात, सोबत तूप असे पदार्थ खाणे पल्लवी पसंत करते. कांदा, खोबरं, लसूण, मिरची अशा वाटपात मराठमोळ्या पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ तिला खूप आवडतात. पल्लवी उत्तम स्वयंपाकही बनवते. तिला नवनवीन पदार्थ बनवायला फार आवडतात. ती म्हणते, जोपर्यंत स्वतः स्वयंपाक करत नाही तोपर्यंत जेवण बनवण्यातील खरी मजा कळत नाही. ओले बोंबील फ्राय, साबुदाणा खिचडी आणि तुपातलं मटण… पल्लवीच्या हातच्या या पदार्थांना फार पसंती आहे.

जास्तीत जास्त घरचं जेवण अन् जेवणात कमीत कमी साखर हा उत्तम आरोग्याचा योग्य मार्ग आहे, हे सांगायला पल्लवी विसरत नाही.

एक आठवण 

पल्लवीने मुलाखतीदरम्यान एक सुंदर किस्सा सांगितला. ‘रुंजी’ मालिकेचं शूटिंग मढ येथे चालू असताना जेव्हा जेव्हा दोन-तीन सीनदरम्यान वेळ मिळे तेव्हा पल्लवी शूटमधून निघून वर्सोवाच्या पलीकडे असणाऱया ‘गझाली’तले  मासे खाण्यास जायची. ती पह्नवरून शूटिंगचे सर्व अपडेट घ्यायची आणि  जेवून लगेच सेटवर पोहोचायची. या सगळ्यात फार धावपळ व्हायची, पण फार मज्जासुद्धा यायची.