
अगाथा क्रिस्तीच्या ‘द सिटाफोर्ड मिस्टरी’वर आधारित ‘चार्ली चोप्रा – द मिस्टरी ऑफ सोलांग व्हाली’ ही वेबसीरिज. रहस्यमय अशी उत्कंठा वाढवणारी ही मालिका रोमांचक पद्धतीने आपल्या समोर मृत्यूचे गूढ उलगडते. रहस्यकथांच्या खास प्रेक्षकवर्गासाठी ही मालिका बघणं ‘मस्ट’ आहे.
सो नी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘चार्ली चोप्रा – द मिस्टरी ऑफ सोलांग व्हाली’ या नावाने काही दिवसांपूर्वी 40 मिनिटांचा एक भाग आला. नावातच कळत होतं की, मालिका रहस्य-रोमांचने भरपूर असणार आणि पहिल्या भागातच झलक दिसली. ब्रिगेडियरचा मृत्यू आणि मृत्यू की हत्या? हा संशय निर्माण करणारी परिस्थिती. 30 जून 2023 रोजी पहिला भाग आला आणि पुढचे भाग किती असणार, कधी येणार याची काहीच बातमी नाही. सर्वांची उत्कंठा वाढवीत जवळपास तीन महिन्यांनी 27 सप्टेंबरला पुढचे पाच भाग आले, तर एकूण सहा भागांची ही वेबसीरिज हळुवार आणि रोमांचक पद्धतीने झालेल्या मृत्यूचे गूढ उलगडत आपल्या समोर या हत्येला कारणीभूत असलेल्याचा चेहरा समोर आणत संपते.
मनालीतील सोलांग दरीच्या परिसरात ब्रिगेडियरचा बंगला असतो. ज्या रात्री त्याचा संशयास्पद मृत्यू होतो त्या रात्री त्याचे जवळचे नातेवाईक तिथे जमलेले असतात, पण पोलिसांना त्याच्या भाच्याची चावी घटनास्थळी सापडते आणि तो या प्रकरणात अडकतो. त्याची मैत्रीण चार्ली चोप्रा गुप्तहेर असते, ती धावतपळत तिकडे येते आणि अर्थातच सगळी सूत्रे हाती घेत कारणासकट हत्या करणाऱया व्यक्तीला सर्वांसमोर आणते हे थोडक्यात कथासूत्र.
अगाथा क्रिस्ती हे लेखन क्षेत्रातील खूप मोठे नाव. 66 गुप्तहेर कादंबऱयांच्या त्या लेखिका आहेत. गिनीज बुकमध्ये त्यांचे नाव आहे. कारण त्यांच्या कादंबऱयांचा खप 2 अब्जांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या ‘माऊस ट्रप’ या कादंबरीवर आधारित नाटक आत्तापर्यंतचे सर्वाधिक प्रयोग झालेलं नाटक आहे, ज्याचे आतापर्यंत सत्तावीस हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. तर वाचकहो, चार्ली चोप्राची कथा अगाथा क्रिस्तीच्या ‘द सिटाफोर्ड मिस्टरी’वर आधारित आहे. जाणकारांना अगाथा क्रिस्टी हे नाव परिचयाचे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी या चार ओळी या महान लेखिकेबद्दल.
रहस्यकथा म्हटलं की, त्याचे गूढपण कायम ठेवण्यासाठी तशा पद्धतीची वातावरण निर्मिती आवश्यक असते. छायाप्रकाशाचा खेळ, हलकी कथेला साथ देणारी रंगसंगती इथे छान जपली गेली आहे. बर्फाळ प्रदेशात चित्रीकरण केल्यामुळे बर्फाचा वापरही छान केला आहे. पांढराशुभ्र जमलेला बर्फ आपल्यालाही जमवून ठेवतो, म्हणजे हलू देत नाही. क्रिस्तीच्या हेरकथांचे हेच वैशिष्टय़ होते किंवा आहे. त्यामुळेच या कथा आजही नव्याने बनत आहेत. ‘द सिटाफोर्ड मिस्टरी’ जवळपास नव्वद वर्षे जुनी कथा आहे, पण अजूनही आपली छाप सोडून जाते.
कथा किंवा कादंबरी छान असली की, सलग वाचली जाते, पण तिला जेव्हा सिनेमा किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून आणले जाते तेव्हा दिग्दर्शक, छायाचित्रकार आणि कला दिग्दर्शकाची भूमिका खूप मोलाची असते. प्रभावी लेखन तेवढय़ाच प्रभावी पद्धतीने दृकश्राव्य माध्यमातून लोकांसमोर आणणं सोपं काम नाही आणि जर लेखन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असेल तर जबाबदारी वाढतेच. इथे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली आहे. भारद्वाज यांनी यापूर्वी शेक्सपियरसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखकाच्या ऑथेल्लो आणि मॅकबेथ कृतींवर ‘ओंकारा’ आणि ‘मकबूल’सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ‘चार्ली…’ला पण योग्य न्याय दिला आहे आणि तासदाक हुसेन यांनी दृश्यं छान टिपून चांगली साथ दिली आहे. पार्श्वसंगीतही कथेला योग्य असे आहे.
कलाकारांबद्दल बोलायचे तर नीना गुप्ता, गुलशन ग्रोव्हर, लारा दत्ता, चंदन रॉय, ललित परिमू आणि नसीरभाईंचा परिवार (रत्ना पाठक, दोन्ही मुलं इमाद आणि विवान आणि स्वत नासिरुद्दीन शाह) यांच्यासारख्या मातब्बर आणि अनुभवी कलाकारांची फौज इथे आहे. त्यामुळे अभिनय या विषयावर बोलायचे झाले तर सगळ्यांनी आपापली कामे चोख बजावली आहेत एवढेच. हे सर्व कुशल कलाकार असल्यामुळे असेल, पण यांना आणखीन बघावेसे वाटले. कारण या सगळ्यांच्या वाटय़ाला मोठी भूमिका नाहीये. सगळे येऊन जाऊन आहेत. मुख्य भूमिकेत म्हणजेच चार्ली चोप्राच्या भूमिकेत वामिका गब्बी आहे. हत्येचे गूढ तीच उलगडते. त्यामुळे तिची मोठी भूमिका आहे, ती डळमळली असती तर कथाही डळमळली असती, पण नाही, वामिकाने सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. ‘ग्रहण’, ‘ज्युबिली’सारख्या वेब सीरिजमधून तिने आपले अभिनय गुण दाखवून दिलेच आहेत.
शेक्सपियर, अगाथा क्रिस्तीसारख्या लेखकांचे काम हिंदीत बघायला मिळणे म्हणजे मेजवानीच आणि ही मेजवानी दिल्याबद्दल विशाल भारद्वाज आणि टीमचे कौतुक.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार)



























































