शक्तिपीठच्या विरोधासाठी आज कोल्हापुरात शेतकरी मेळावा! कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडवलदारांना हाताशी धरून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शक्तिपीठ महामार्ग ड्रीम प्रोजेक्टला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. शक्तिपीठच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकलून लावू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिला. शक्तिपीठच्या नावाखाली भांडवलदारांचे पोषण आणि शेतकऱ्यांचे शोषण होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्या (दि. 14) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे शिंत्रे यांनी सांगितले.

शिंत्रे म्हणाले, जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनात सक्रिय होणार आहेत. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना आहे. शासन पातळीवर संयुक्त मोजणीचा घाट घातला आहे. जमीन एकदा गेली की परत मिळणार नाही. विदर्भातील जमिनी कोरडवाहू आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात बागायती जमिनी आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प हाणून पाडला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातून 121 किलोमीटर महामार्ग नेण्यासाठी नव्याने संरचना केली आहे. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांतून महामार्ग जाणार आहे, असे शिंत्रे म्हाणाले.

जयसिंग टिकले, गणेश बागडी, संजय पाटील, सुधाकर जगताप, सुरेश हेंबाळे, प्रकाश सासुलकर, वसंत नाईक, प्रकाश रावळ, विशाल चव्हाण उपस्थित होते.

शक्तिपीठमुळे गावच शिल्लक राहणार नाही ः पोवार

शक्तिपीठ महामार्ग आजरा तालुक्यातील एरंडोल गावातून नेण्यात येणार आहे. या गावात एका बाजूला तलाव आणि दुसऱ्या बाजूला महामार्ग आल्यास नकाशात गावदेखील शिल्लक राहणार नाही. संपूर्ण शेतजमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे आमचा विरोध राहील, असे तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी सांगितले.