
शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक गिरीश जाधव यांचे मंगळवारी जयसिंगपूर येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. जाधव यांनी राज्यभर फिरून शस्त्रांचा विपुल संग्रह केला होता. हा संग्रह वाढवतानाच त्यांनी शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व आणि संदर्भग्रंथांचे वाचन करून सखोल अभ्यास केला.
मुंबईत कुर्ला येथे दीर्घकाळ वास्तव्य करताना त्यांनी शस्त्रसंग्रह वाढवला. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद अशा शहरांतील अनेक ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा ते शोध घेत राहिले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, लखुजीराजे जाधव प्रतिष्ठान, शाहीर परिषद यासह राज्य आणि देशपातळीवरील विविध संस्था-संघटना तसेच शासन व खासगी ट्रस्टची वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व विभागाच्या विविध समित्यांवर ते तज्ञ-मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते.

























































