
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत 75 वर्षीय सेलवम्मा या आजीबाईंचे कौतुक केले आहे. सेलवम्मा या बंगळुरूत मक्याच्या कणसाचा छोटासा गाडा चालवतात. महत्त्वाचे म्हणजे मक्याचे कणीस भाजण्यासाठी त्या सौरऊर्जाचा वापर करतात.
गेल्या 20 वर्षांपासून बंगळुरू विधानसभेजवळ सेलवम्मा या आजीबाई मक्याच्या कणसाचा गाडा चालवत आहेत. त्यांच्याकडे सौरऊर्जेवर चालणारा छोटा फॅन आहे. जेणेकरून कणसाला हाताने हवा मारावी लागत नाही. या सोलार फॅनचा किस्सादेखील भन्नाट आहे. गर्दीच्या ठिकाणी सेलवम्मा यांचा स्टॉल आहे. पूर्वी सगळ्यांप्रमाणेच कणीस भाजण्यासाठी त्यादेखील हातानेच वारा घालायच्या. तासन् तास वारा घातल्यामुळे त्यांचे हात दुखायचे.
त्यांची ही धडपड पाहून सेल्को सोलर लाईट फाऊंडेशनने हा फॅन त्यांना भेट म्हणून दिला होता. फॅनसोबत यात एलईडी लाईटदेखील आहे. या फॅनमुळे माझे कष्ट वाचले असून आधीपेक्षा निम्मा वेळ कणीस भाजण्यासाठी लागतो, असे सेलवम्मा सांगतात.




























































