चिंता वाढतेय, दोन्ही डोस घेतलेल्या 10 जणांना डेल्टा प्लसची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना विषाणूपाठोपाठ डेल्टा प्लसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत आतापर्यंत ‘डेल्टा प्लस क्हेरियंट’चे 66 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 10 जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. डेल्टा प्लसमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव, रत्नागिरी, पालघर, रायगड आदी जिह्यांत मागील काही दिवसांत डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची हिस्ट्री जाणून घेतली असता 10 जणांचे कोरोनाचे दोन्ही डोस झालेले आहेत तर 8 जणांनी केवळ 1 डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी 2 जणांनी कोवॅक्सिन तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोविड विषाणूचे जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. दर महिन्याला प्रत्येक जिह्यातून 100 नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते. राज्य सरकारने यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स ऍण्ड इन्टीग्रेडेट बायोलॉजीसोबत करार केला असून त्यांच्या तपासणीत राज्यात 80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आले आहेत.

66 पैकी 61 कोरोनातून बरे झालेले

राज्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लसच्या 66 रुग्णांपैकी 61 रुग्ण हे कोरोनातून बरे झालेले आहेत. या रुग्णांपैकी 31 रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केलेले नाही.

डेल्टा प्लसमुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला. या 5 जणांपैकी दोघांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी कोणताही डोस घेतलेला नव्हता.