
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबांतील आप्तस्वकीयांचा बळी घेतला. तसेच या मनुष्यहानीबरोबरच देशातील एक कोटी लोकांचा रोजगारही कोरोनाने खाल्ला असून, तब्बल 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले. बेरोजगारीचा दर 12 टक्क्यांवर गेला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत ‘सीएमआयई’चे मुख्याधिकारी महेश व्यास म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाच्या अनेक भागांत कडक निर्बंध लावावे लागले. काही ठिकाणी लॉकडाऊन लावला. याचा थेट परिणाम अर्थचक्रावर झाला असून, तब्बल एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. ‘सीएमआयई’ने देशाच्या विविध भागात आणि विविध आर्थिक स्तरातील 1.75 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले.
चांगल्या नोकरीसाठी एक वर्षाचा कालावधी लागेल
जे लोक बेरोजगार झाले त्यांना पुन्हा नोकरी मिळण्यासाठी मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागेल. असंघटित क्षेत्रात रोजगार निर्मिती सुरू होईल; पण संघटित क्षेत्रात आणि चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या मिळण्यासाठी एक वर्षाचा तरी कालावधी लागेल, असे व्यास यांनी सांगितले.
बेरोजगारीचा दर 12 टक्क्यांवर
पहिल्या लाटेत बेरोजगारीचा दर 23.5 टक्क्यांवर गेला होता. अनलॉकनंतर हळूहळू परिस्थिती सुधारत असतानाच दुसरी लाट आली. याचा फटका लहानमोठय़ा उद्योग, व्यवसायांना बसला. एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्के होता, तो मे महिन्यात 12 टक्क्यांवर गेला आहे. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसाठी 3 ते 4 टक्के इतकाच बेरोजगारीचा दर हवा याकडेही व्यास यांनी लक्ष वेधले.




























































