
दहावी-बारावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पेपर सोडविण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या नव्या वेळेविषयी राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सर्व परीक्षा पेंद्र संचालकांना सूचना दिल्या आहेत.
प्रश्नपत्रिका वाचनासाठी मिळणाऱया दहा मिनिटांची सूट रद्द केल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी पसरली होती. अनेकांनी बोर्डाकडे संपर्क साधून दहा मिनिटे वाढवून देण्याची मागणी केली होती. अखेर विद्यार्थी, पालकांच्या या मागणीला यश आले असून परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात यावा, परीक्षा कालावधीत सुधारित वेळेनुसार इशारा घंटेचे नियोजन करावे, अशा लेखी सूचना राज्य शिक्षण मंडळाने जारी केल्या आहेत.
यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर देण्यात येत होती, मात्र यंदापासून बोर्डाने ही सुविधा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही वर्षांत प्रश्नपत्रिका मोबाईल तसेच अन्य समाजमाध्यमांतून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना घडल्याने बोर्डाची प्रतिमा मलीन झाली होती.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा पेंद्रावर उशिरा पोहोचणाऱया विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या.
प्रश्नपत्रिकांचे वाटप सकाळच्या सत्रात सकाळी 11 वाजता आणि दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता करण्यात येणार असून या वेळेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही, याची खबरदारी पेंद्र संचालक, पर्यवेक्षकांनी घ्यावी.
– अनुराधा ओक,सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
सुधारित वेळ
सकाळ सत्र
सकाळी 11 ते दुपारी 2.10
सकाळी 11 ते दुपारी 1.10
सकाळी 11 ते दुपारी 1.40
दुपार सत्र
दुपारी 3 ते सायंकाळी 6.10
दुपारी 3 ते सायंकाळी 5.10
दुपारी 3 ते सायंकाळी 5.40


























































