
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठय़ात घट झाल्याने उन्हाळ्यातील पाणीपुरवठय़ाच्या नियोजनासाठी मुंबईत शुक्रवार, 15 मेपासून 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडीबाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावांत पुरेसा पाणीसाठा जमा होईपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. 11 मे रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण 3 लाख 40 हजार 399 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटरच्या तुलनेत सध्या 23.52 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अपुऱ्या पाणीसाठय़ामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा मिळवला जाणार आहे.






























































