मंगळवारपासून संपूर्ण मुंबईत आठवडाभर 10 टक्के पाणीकपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
water-tab

मंगळवार, 3 डिसेंबरपासून सोमवार, 9 डिसेंबरपर्यंत संपूर्ण मुंबई 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. पालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये केल्या जाणाऱया दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. यानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे.