पुणे – बेडसाठी हेल्पलाईनवर दररोज 10 हजार कॉल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. यामुळे महापालिकेने कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने चोवीस तास हेल्पलाईनचे नंबर प्रसिद्ध केले आहेत. या हेल्पलाईनवर दिवसाला तब्बल 9 ते 10 हजार फोन येत आहेत.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, सक्रिय रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयातील कोरोना बाधितांसाठीचे आरक्षित बेड भरत चालले आहेत. त्यामुळे खाटा मिळविण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.

कोरोनाबाधितांना 6 उपचारांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने ‘कोविड-19 वॉर रूम’ उभारले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान या ‘वॉर रूम’च्या माध्यमातून महापालिकेने अनेक रुग्णांना बेड मिळवून दिले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या हेल्पलाईनवरील फोनची संख्या कमी म्हणजे दिवसाला सुमारे 20 इतकी झाली होती. मात्र, आता पुन्हा त्याचे प्रमाण वाढले आहे.

दिवसभरात तीन शिफ्टमध्ये या ‘वॉर रूम’चे काम चालते. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी ‘वॉर रूम’च्या हेल्पलाईनवर सहा तासांच्या एका ‘शिफ्ट’मध्ये सुमारे साडेचारशे फोन यायचे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दिवसभरात 30 ते 50 फोन यायचे, हे फोन अगदी 20 पर्यंत गेले होते.

मात्र, आता दिवसभरातील फोनची संख्या दोनशेच्या वर पोहोचली आहे. त्यामध्ये ऑक्सिजनयुक्त बेडच्या उपलब्धतेबाबत विचारणा करणारे फोन सर्वाधिक आहेत. आता जम्बो रुग्णालय सुरू झाले आहे, तसेच कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयांतील खाटाही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यास मदत मिळेल, असे मत ‘वॉर रूम’मधील डॉक्टरांचे आहे.