दहावीचे विद्यार्थी कोटय़ातील वाढीव गुणांना मुकणार? प्रस्ताव सादर करण्यास 15 जानेवारीपर्यंतच मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळ, चित्रकला, शास्त्राrय कला क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेले तसेच लोककला प्रकारात सहभाग घेतलेले दहावीचे विद्यार्थी कला कोटय़ातील वाढीव 25 गुणांना मुकण्याची शक्यता आहे. कोटय़ातील गुणांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळांना 15 जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. ही मुदत अपुरी असून मुदतवाढ देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने 12 जानेवारीला उशिरा परिपत्रक जारी करून कोटय़ातील वाढीव गुणांचे प्रस्ताव 15 जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना शाळांना दिल्या. मुदतीनंतर येणाऱया अर्जांचा विचार केला जाणार नाही असेही या परिपत्रकात म्हटले आहे, पण बोर्डाच्या या सूचना अन्यायकारक असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील शाळा बंद असून अनेक विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठीही शाळेत आलेले नाहीत. अशा परिस्थितीत कोटय़ाचे प्रस्ताव कसे सादर करणार, हे प्रस्ताव सादर करण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून द्यावी अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोनामुळे यंदा चित्रकला परीक्षा नाहीत

कोरोनामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची परीक्षा झालेली नाही. दहावीच्या परीक्षेला बसणारे 10 ते 15 टक्के विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण परीक्षाच न झाल्याने हे विद्यार्थी वाढीव गुणांना मुकण्याची शक्यता आहे. इतर परीक्षांप्रमाणे योग्य खबरदारी घेऊन एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे आयोजनही कला संचालनालयाने करावे अशी मागणीही मुख्याध्यापक संघाने केली आहे.