पहिली गुणवत्ता यादी 6 ऑगस्टला,  5 ऑगस्टपर्यंत अर्ज विक्री

320

मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी  अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार मंगळवारी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी 6 ऑगस्टला सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्रवेशअर्ज भरण्यासही एक दिवस वाढवून दिला असून आता उद्या 5 ऑगस्टपर्यत महाविद्यालयांना अर्ज विक्री करता येणार आहे.

सोमवारी रात्रीपासून मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्य सरकारने सरकारी कार्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे मुंबई विद्यापीठानेही प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मुदतवाढ दिली आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 24 जुलैपासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात झाली. 4 ऑगस्टपर्यंत विद्यार्थांना अर्ज करता येणार होता. तसेच पहिली गुणवत्ता यादी 4 ऑगस्टलाच सायंकाळी 7 वाजता जाहीर करण्यात येणार होती. मात्र मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी कर्मचारी महाविद्यालयात पोहोचू शकले नाहीत. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविल्याने खबरदारी म्हणून सरकारने सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.

असे असेल सुधारित वेळापत्रक

  • प्रवेश पूर्व नोंदणी आणि अर्ज विक्री 5 ऑगस्टपर्यंत
  • पहिली गुणवत्ता यादी 6 ऑगस्ट, सकाळी 11 वा.
  • कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणे 11 ऑगस्ट, दुपारी 3 पर्यंत
  • दुसरी गुणवत्ता यादी 11 ऑगस्ट, सायं. 7 वा.
  • कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणे 12 ते 17 ऑगस्ट
  • तिसरी गुणवत्ता यादी   17 ऑगस्ट, सायं. 7 वा.
  • कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणे 18 ते 21 ऑगस्ट
आपली प्रतिक्रिया द्या