
देशातील आयआयटी संस्थांमधील वसतिगृहांतील 11 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचप्रमाणे गेल्या 15 महिन्यांमध्ये शिक्षक आणि कर्मचारी अशा 322 जणांना कोरोनाची लागण झाली असे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.
मध्य प्रदेशातील निमुच येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी देशातील आयआयटी आणि एनआयटी संस्थांकडून यासंदर्भात माहिती मागितली होती. गेल्या 15 महिन्यांमध्ये किती जणांना लागण झाली आणि किती जणांना आपले जीव गमवावे लागले याची आकडेवारी त्यांनी मागितली होती.
केंद्रीय उच्च शिक्षण विभागाने गौर यांच्या अर्जाला उत्तर देताना 20 मे 2021 पर्यंतची माहिती दिली. गौर यांना एकूण आकडेवारी देण्यात आली, मात्र ती प्रत्येक आयआयटी किंवा एनआयटी संस्थानिहाय देण्यात आलेली नाही. कोरोनावर सध्यातरी प्रतिबंधक लस हाच पर्याय असल्याने सरकारने वसतिगृहे आणि अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, असे गौर यांचे म्हणणे आहे.
























































