गहू चोरले म्हणून 11 वर्षाच्या मुलाला उलटं लटकवून चोपले, क्रूर बापाला अटक

424

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे पोलिसांनी एका क्रूर पित्याला अटक केली आहे. या व्यक्तीने त्याच्या 11 वर्षाच्या मुलाला अत्यंत क्रूर पद्धतीने उलटं लटकवून, नागडं करत बेदम चोपले आहे. तसेत त्या मुलाच्या अंगावर त्याने गरम पाणीही ओतले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.

गुड्डू खान असे त्या मुलाच्या वडिलांचे नाव असून त्यांनी बायको घर सोडून गेल्याने तो संतापला होता व त्या रागात त्याने मुलाला बेदम चोपल्याचे पोलिसांना सांगितले आहे. गुड्डू खान हा त्याची पत्नी व 11 वर्षाच्या मुलासोबत मेवाली गावात राहतो. दोन दिवसांपूर्वी गुड्डूचे पत्नीसोबत भांडण झाल्याने ती घर सोडून माहेरी निघून गेली होती. त्यावरून गुड्डू संतापला होता. त्यात गुड्डूच्या मुलाने घरातील एक छोटी पिशवी गहू वाण्याला देऊन त्याच्याकडून चॉकलेट घेतले. ही गोष्ट जेव्हा गुड्डूला कळली. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली.

त्यानंतर त्याने मुलाला घराबाहेरील झाडाला उलटा टांगलं. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला काठीने बेदम मारहाण केली. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी गुड्डूला अडविण्याऐवजी या घटनेचे चित्रीकरण केले. गुड्डू मुलाला मारताना इतका बेफाम झाला होता की त्याला आपण आपल्या पोटच्या पोराला मारतोय याचीही जाणीव राहिली नव्हती. त्यानंतर त्याने मुलाच्या अंगावर गरम पाणीही ओतले. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी गुड्डू खानला पॉक्सो कायद्याअतंर्गत अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या