
भगवान शंकराच्या देशभरातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांना सायकलवरून भेट देण्याचा संकल्प दिल्लीच्या कमल गोला या 41 वर्षीय सायकलपटूने सोडला आहे. 100 दिवसांत त्याने सायकलकरून 8 हजार किमीचा प्रवास गाठला आहे. आतापर्यंत त्याने पाच ज्योतिर्लिंगांना भेटी दिल्या असून नुकताच तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कुडाळमधील सायकलप्रेमींनी त्याचे जंगी स्वागत केले आहे.
पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेला कमल हा गेल्या दहा वर्षांपासून सायकलिंग करतो. 20 वर्षे नोकरी केल्यानंतर देशभरात सायकलभ्रमंती करण्याचे आपले स्कप्न आता तो पूर्ण करतोय. 2018 साली त्याने सायकलवरून चार धाम यात्रा केली होती. त्यानंतर आता कोरोनाचा कहर हळूहळू कमी झाल्यावर 11 नोव्हेंबरपासून बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रवासाला तो निघाला आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर आता तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कुडाळ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश पावसकर यांच्यासह कुडाळ सायकल क्लबचे रुपेश तेली, गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे आणि प्रेमेंद्र पोरे यांनी कमल यांचे जंगी स्वागत केले. सायकलमुळे शरीर फीट राहते तसेच वेगवेगळ्या राज्यात सायकलवरून प्रवास केल्यामुळे तिथल्या भाषा आणि संस्कृतीबद्दल अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेता येते असे तो सांगतो.
आधी जबाबदारी, मग स्वप्न पूर्ण करा !
बारा ज्योतिर्लिंगांना भेट देऊन पुन्हा दिल्ली गाठण्यासाठी कमलला सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळात त्याचे काम पूर्णपणे बंद आहे. दिवसाला तो सायकलकरून 80 किमी अंतर कापतो आणि रात्री एखाद्या हॉटेलकर मुक्काम करतो. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करून मी सायकल प्रवासाला निघालो आहे, त्यामुळे घरातल्यांनीही माझ्या या प्रवासाला विरोध केला नाही. आधी जबाबदारी पूर्ण करा, मग आपली स्वप्न पूर्ण करा असा संदेश यानिमित्ताने त्याने तरुणांना दिला आहे.