
मुंबई पुणे यासारख्या मोठय़ा शहरांमधून कोकणात पायी चालत येणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रेल्वे रुळ किंवा छुप्या मार्गाने चालत कोकणात दाखल होणाऱयांवर पोलिसांची कारवाई सुरु असतानाच शुक्रवारी रात्री दिव्याहून खेडमध्ये आलेल्या तब्बल 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रवाशामध्ये एक सात वर्षाच्या मुलींचाही समावेश असून या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना येथील आयसीएस महाविद्यालयामध्ये संस्थात्मक कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने मुंबई-पुणे यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये राहणाऱया नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. लॉकडाऊनमुळे काहीजंणांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या पर्यायाचा वापर करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी नातूनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेले चौदाजण हे दिवा येथील रहिबासी असून ते खेड तालुक्यातील खाड़ीपट्टा परिसरातील सवणस आणि मुंबई या गावांमध्ये यायला निघाले होते.
पोलिसांची नजर चुकवत कधी रस्त्याने तर कधी रेल्वे रुळातून ते खेडपर्यंत पोहचले मात्र नातुनगर यथील चेकपोस्टवर असलेल्या पोलिसांची नजर चुकवण्यात ते अपयशी ठरले. पोलिसांनी या सर्व प्रवाशांना आरोग्य विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांची आवश्यक ती तपासणी करुन या सर्व प्रवाशांना आयसीएस महाविद्यालयात संस्थात्मक क्वारनटाईन केले. पुढील चौदा दिवस या सर्व प्रवाशांचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे.



























































