चिनी नागरिकाने 1400 कोटींना फसवले, ईडी, सीबीआय कुठे आहेत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका चिनी नागरिकाने अवघ्या 9 दिवसांत 1200 हिंदुस्थानींना 1400 कोटी रुपयांना चुना लावून पलायन केले. देशात इतकी मोठी घटना घडली. ईडी आणि सीबीआय कुठे आहेत. या एजन्सी फक्त विरोधकांवर धाडी मारण्यासाठी आहेत का? असा सवाल करीत काँग्रेस पक्षाचे मीडिया आणि प्रचार (संचार विभाग) चे अध्यक्ष पवन खेरा यांनी शुक्रवारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विरोधी पक्षांतील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करीत आहेत. परंतु, त्यांना चिनी घोटाळा दिसला नाही. याआधी विजय मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहूल चोक्सी आणि आता चिनी नागरिक पळाला. एक बनावट फुटबॉल सट्टेबाजी ऍप बनवून हजारो लोकांना चुना लावला गेला. गुजरातमध्ये 1400 कोटी रुपयांची फसवणूक करून एक चिनी पळून गेला. परंतु, मोदी आणि अमित शहा हे चिनी नागरिकाला रोखू शकले नाहीत. ‘दानी डेटा ऍप’ घोटाळ्यात 46 हजार कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे, असेही पवन खेरा यांनी म्हटले.

रोज 200 कोटींची फसवणूक
फुटबॉल खेळात रुची असणाऱया व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी बनावट फुटबॉल ऍप बनवण्यात आले. यातून दररोज 200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यावेळी मोदी सरकार झोपले होते काय? उत्तर प्रदेश सरकारने या ऍपला प्रमोट का केले, या प्रचार मोहिमेमागे कोण आहेत, याचा तपास व्हायला हवा, असे खेरा म्हणाले.