
जागतिक स्तरांवर टेक कंपन्या धडाधड नोकरकपात करत असताना आता या यादीत नोकिया कंपनीचीही भर पडली आहे. नोकिया जागतिक वर्कफोर्समध्ये तब्बल 20 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जवळपास 14 हजार कर्मचाऱयांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. सध्या नोकियाकडे जागतिक स्तरावर 74 हजार कर्मचारी आहेत. यापैकी 14 हजार कर्मचाऱयांना नोकरीवरून काढून टाकले जाणार आहे. या नोकरकपातीचा फटका हिंदुस्थानातील कर्मचाऱयांनाही बसणार आहे.
गेल्या काही महिन्यापासून ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटासह अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱयांना कामावरून काढले आहे. आता नोकियानेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले असून 14 हजार कर्मचाऱयांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. नोकियाच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानातील आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोकियाच्या कपातीमागे काही कारणे सांगितली जात आहेत. 2023 मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे अपेक्षित निकाल मिळाले नाहीत. त्यामुळे कंपनी पुन्हा जुन्या हॉरिझोंटल संरचनेकडे परतत आहे. क्लाउड अँड नेटवर्क सर्विसेस आणि मोबाईल नेटवर्क्सचे विलीनीकरण केले जात आहे. 2018 मध्ये नोकियाकडे 1 लाख 3 हजार कर्मचारी होते.



























































