केजरीवालांना धक्का! दिल्लीत आपचे 15 नगरसेवक फुटले

दिल्ली महानगरपालिकेतील आम आदमी पक्षाच्या 15 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुकेश गोयल यांच्या नेतृत्वातील ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ नावाच्या तिसऱया आघाडीची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ‘आप’ला फोडाफोडीच्या राजकारणाचा हा दुसरा धक्का आहे.

सर्व नगरसेवक 2022 मध्ये आपच्या तिकिटावर निवडून आलो, मात्र महानगरपालिकेत पक्षाची सत्ता येऊनही पक्षाचे नेतृत्व पालिका योग्यरीत्या चालवू शकले नाही. वरिष्ठ नेते आणि नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याने पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे आम्ही नगरसेवक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

भाजपकडून फोडाफोडी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने फोडाफोडीचे राजकारण करत आठ आमदारांना आपल्या बाजूने खेचले. विधानसभा जिंकल्यानंतर सत्ताधारी भाजपने सहा दिवसांनी आपच्या तीन नगरसेवकांना पक्षात घेतले. याशिवाय चार आप नेतेही भाजपमध्ये सामील झाले.

गेल्या महिन्यात भाजपचा महापौर

गेल्या महिन्यात 25 एप्रिल रोजी दिल्लीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. आपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली आणि भाजप उमेदवार राजा इक्बाल सिंह यांनी 133 मतांनी महापौरपद जिंकले. तर भाजप नगरसेवक जय भगवान यादव यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यांना एपूण 142 मते मिळाली. काँग्रेसला केवळ आठ मते पडली तर एक मत अवैध घोषित करण्यात आले. 117 नगरसेवक असल्यामुळे भाजपचा विजय आधीच निश्चित होता.