
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून देणगी गोळा करण्यात आली. जवळपास पाच हजार कोटींहून अधिक निधी देणगी स्वरूपात ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला प्राप्त झाला. या निधी संकलनात देणगी म्हणून प्राप्त झालेले 22 कोटी रुपयांचे तब्बल 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत.
राममंदिराच्या उभारणीसाठी देशभरात निधी संकलनाची मोहीम राबवण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि इतर सहयोगी संघटनांनी देशभरातून राममंदिरासाठी देणगी गोळा केली. यामध्ये काहींनी रोख रक्कम, काहींनी ऑनलाइन ट्रान्स्फर तर काहींनी चेकच्या स्वरूपात देणग्या दिल्या. मात्र, देणग्यांच्या या चेकपैकी विश्व हिंदू परिषदेने गोळा
केलेले तब्बल 15 हजार चेक बाऊन्स झाल्याची धक्कादायक बाब रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या लेखा परीक्षणानंतर समोर आली आहे.
मंदिर उभारणीसाठी चेकद्वारे देणगी देणाऱयांच्या खात्यात पुरेसे पैसे नसणे, चेकवर खाडाखोड, स्वाक्षरीमध्ये तफावत अशा कारणांनी 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत. ट्रस्टसंबंधित बँकांशी समन्वय साधून काम करत आहे. ज्यांचे चेक बाऊन्स झाले अशा व्यक्तींना बँकांद्वारे ते चेक परत करून चुका सुधारण्यासाठी ट्रस्टकडून प्रयत्न केला जाणार असल्याची, माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली.
22 कोटींची देणगी अडकली
बाऊन्स झालेल्या चेकमध्ये एकूण 22 कोटींची देणगी अडकली आहे. विशेष म्हणजे, यापैकी 2000 चेक हे अयोध्येतून प्राप्त झाले होते. उर्वरित 13000 बाऊन्स चेक देशाच्या विविध भागांतून प्राप्त झाले आहेत. ते चेक परत पाठवले जातील, अशी माहिती ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली.
























































