
राज्यात विद्यार्थ्यांना आधार कार्डशिवाय संचमान्यता केली जाणार नाही, अशाप्रकारची भूमिका राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे. राज्यात लाखो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही जुळता जुळेना अशी परिस्थिती आहे. नगर जिह्यात सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती व शाळेतील माहिती जुळेना, अशी स्थिती समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड नाहीत. प्रशासन प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढणे आणि ती माहिती जुळेल, यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील विविध समस्या समोर येत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
शाळेत येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्डवरील माहिती अपूर्ण असल्याने सदरची माहिती शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवली असता, ती माहिती ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत असला तरी आधार नसल्याने तो विद्यार्थी संचमान्यतेसाठी गृहीत धरला जाणार नाही. अशा परिस्थितीत शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यापासून ते नव्याने आधार कार्ड काढण्यापर्यंतच्या कामासाठी धावपळ करावी लागत आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी संबंधित केंद्राचे संचालक शंभर रुपये आकारत असल्याने गरीब पालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, शाळांना आधार कार्ड हवे आहे. यातून संघर्षही होत असल्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सांगितले.
नगर जिह्यातील 14 तालुके व एक महापालिका क्षेत्रात 2 लाख 20 हजार 757 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 2 लाख 6 हजार 159 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व त्यासंबंधीची माहिती अचूक आहे. 14 हजार 598 विद्यार्थ्यांची माहिती जुळत नाही. नगर जिह्यातील माहिती न जुळणाऱया विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण केवळ सात टक्के आहे. महापालिका कार्यक्षेत्रात दहा टक्के, पारनेर तालुक्यात 13 टक्के, जामखेड 11.40 टक्के, श्रीरामपूर 7.47, संगमनेर 2.77 टक्के विद्यार्थ्यांची माहिती जुळत नाही. नगर जिह्यात सर्वात कमी विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील आहेत. सर्वाधिक विद्यार्थी पारनेर तालुक्यातील आहेत.
संस्था न्यायालयात जाणार
विद्यार्थी वर्गात शिकत आहेत. विविध कारणाने विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही. आधार कार्ड काढणे ही पालकांची जबाबदारी आहे. शाळांनी व शिक्षकांनी वारंवार विनंती करूनही आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा मागास असलेल्या पालकांना रोजगार बुडून ही कामे करणे कठीण जात आहे. त्यामुळे पालक आधार कार्ड अपडेट करण्याला वेळ देत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांची संख्या पडताळून प्रशासनाने पर्यवेक्षकीय यंत्रणेचा उपयोग करावा. मात्र, आधार कार्ड नाही म्हणून शिक्षक न देण्याची भूमिका अन्यायकारक आहे. या प्रकारची भूमिका घेऊन शिक्षक दिले न गेल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राज्यातील शिक्षक संघटनांनी दिला आहे.
प्रवेशावरती परिणाम होण्याची शक्यता
राज्यात शाळेत प्रवेश देताना कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शाळापातळीवर कायद्याची तरतूद लक्षात घेऊन व्यवस्थापन विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहे. मात्र, आता आधार कार्डची सक्ती होत असल्यामुळे व्यवस्थापन विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर प्रवेश न देण्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे, असे घडल्यास अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
नगरमध्ये 500 शिक्षक कमी होण्याचा धोका
राज्यात शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या व आधार कार्ड उपलब्ध असणारी विद्यार्थीसंख्या लक्षात घेता व आधार कार्डवरील माहिती न जुळणारे विद्यार्थ्यांचे प्रमाण लाखांच्या घरात आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुळत नाहीत अथवा आधार कार्ड उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेत शिकत असले तरी त्यांच्यासाठी शिक्षक दिले जाणार नाहीत, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे आधार कार्डशिवाय शिकणारे विद्यार्थी लक्षात घेतले तर त्यांना वजा करून शिक्षक दिले जाणार असल्याने शिक्षकसंख्या घटण्याची शक्यता आहे. सरासरी 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे सध्याचे प्रमाण आहे. संचमान्यता देताना तीन हजार विद्यार्थ्यांसाठी शंभर शिक्षक असे गृहीत धरले तर एकटय़ा नगर जिह्यात 500 शिक्षक कमी होण्याचा धोका आहे.



























































