
सामना ऑनलाईन, अयोध्या
अयोध्येत राममंदिर पूर्वी होते, आहे आणि भविष्यात राहणारच, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तसेच अयोध्येत भगवान श्रीरामाची 151 मीटर उंच मूर्ती उभारणार असल्याची घोषणाही योगी यांनी केली. राममंदिराच्या जागेविषयी पत्रकारांशी संवाद साधताना योगी म्हणाले, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की, अयोध्येत राममंदिर आधीपासून होते. मी इथे प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. इथे राममंदिर होते, आहे आणि राहणारच. मंदिर भव्य कसे करता येईल, याचा सरकार विचार करीत आहे. आमच्याकडे सर्व पर्याय आहेत; परंतु कायद्याचा आणि घटनेचा विचार करून योग्य तो पर्याय स्वीकारण्यात येईल. त्यामुळे आम्ही अजून वाट बघत आहोत. भगवान श्रीरामांच्या मूर्तीचे काम मूर्तिकार-शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे.



























































